(रत्नागिरी / प्रतिनिधी)
शेतकऱ्यांचा मित्र समजली जाणारी बैलजोडी शेतातून हळूहळू लुप्त होऊ लागली आहे. आधुनिक यांत्रिकीकरणाच्या काळात शेतकरी आता पॉवरटिलरला पसंती देताना दिसत आहेत.
काही वर्षांपूर्वी शेतीचा हंगाम सुरू झाला की, शेतात बैलजोडी आणि जोते दिसत असत. पेरणीपासून लावणीपर्यंत शेतात राबणारा शेतकरी आणि गोलाकार मार्गाने फिरणारी जोते हे दृश्य हमखास दिसत असे. एका एका शेतात तीन-तीन जोतेही फिरताना दिसत असत. पण काळ बदलत चालल्याच्या खुणा आता अनेक ठिकाणी स्पष्ट दिसू लागल्या आहेत. शेतातील बैलांची जागा आता आधुनिक यंत्राने घेतली आहे. जोतांच्या जागी आता पॉवरटिलर फिरताना दिसत आहेत. त्याचप्रमाणे बैलांची मागणी मोठ्या प्रमाणात घटल्याने उन्हाळ्यात ठिकठिकाणी भरणारे बैल बाजारही बंद झाले आहेत. लांजा, शिपोशीप्रमाणेच मलकापूर येथील बैल बाजार प्रसिद्ध होते. पण आता काही बाजार बंद झाले आहेत.
कृषी विभागाकडून यांत्रिकीकरणासाठी भरघोस अनुदान दिले जाते. चाळीस टक्के ते पन्नास टक्के अनुदान दिले जाते. त्यामुळे बैलजोडीच्याच किमतीत पॉवरटिलरसारखी आधुनिक आणि वापरावयास सोपी मशीन मिळत असल्याने शेतकऱ्यांचा कल आता यांत्रिकीकरणाकडे वाढत आहे.