( रत्नागिरी / प्रतिनिधी )
रत्नागिरी नागपूर मार्गावरील पानवल येथे गुरुवार २६ जानेवारी रोजी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास तीन वाहनांचा अपघात झाला होता. या अपघातात एसटी बस चालकाने समोरील दोन वाहनांना धडक देऊन नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पर्शुराम देमाणा मेटकर (३९. माणगाव, ता. चंदगड, कोल्हापूर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या एसटी बस चालकाचे नाव आहे. याबाबतची फिर्याद मनिष निळकंठ चव्हाण (३१. शांतीनगर, रसाळवाडी, रत्नागिरी) यांनी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एसटी बस चालक पर्शुराम मेटवर हा आपल्या ताब्यातील बस घेऊन हातखंबाच्या दिशेने जात होता. पानवल येथे आला असता बेदरकारपणे गाडी चालवून पुढे उभ्या असलेल्या सेलटॉस गाड़ी (एमएच ०८ एएक्स५६५५) या गाडीला मागून धडक दिली. तसेच पुढे असलेल्या इनोव्हा कार (एमएच ०८ एजी ०२८१) या गाडीलाही धडक बसली. या अपघातात सेलटॉस गाडीतील शिला शशिकांत चव्हाण यांच्या डोक्याला मुका मार लागला. तसेच एसटी बसचेही नुकसान झाले. या अपघाताची तक्रार मनिष चव्हाण यांनी पोलीस ठाण्यात दिल्यानंतर चालक पर्शुराम मेटकर याच्यावर भादविकलम २७९ ३३७. मोटर वाहन कायदा कलम १८४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.