(दापोली)
फिट येऊन विहिरीच्या पाण्यात पडून एका ३८ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना ६ जानेवारी रोजी दुपारी २ वाजून ४५ मिनिटांनी घडली. याबाबत दापोली पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत दापोली पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, समर्थ सुरेश केळकर (३८, रा. करंजाणी उघडा मारुती तालुका दापोली) हा आसिफ देसाई यांच्याकडे पाण्याचे पंप बसविण्याचे काम करत होता. समर्थ केळकर याला फिट येण्याचा आजार होता. दि. ६ जानेवारी रोजी दुपारच्या सुमारास तो लाडघर येथील एका विहिरीत पंप बसवण्याचे काम करत असताना त्याला अचानक फिट आली आणि तो विहिरीच्या पाण्यात पडला. यामध्ये तो बेशुद्ध झाला त्याला तत्काळ दापोली उपजिल्हा रुग्णालय येथे अधिक उपचारासाठी दाखल करण्यात आले.
मात्र तपासाअंती डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले. या घटनेची खबर मयत समर्थचे वडील सुरेश केळकर यांनी दापोली पोलिस ठाण्यात दिली असून या घटनेचा अधिक तपास दापोली पोलिस ठाण्याचे हे. कॉ. गुजर हे करीत आहेत.