राजस्थानमध्ये मुख्याध्यापकाच्या माठातील पाणी प्यायल्याची शिक्षा एका दलित विद्यार्थ्याला जीव देऊन चुकवावी लागली. जालोर जिल्ह्याच्या सुराणा येथील सरस्वती विद्यालयात तिसरीत शिकणारा विद्यार्थी इंद्रकुमार मेघवालने शनिवारी अहमदाबादच्या रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. पोलिसांनी मुख्याध्यापकाला ताब्यात घेतले आहे. घटना २० जुलैची आहे.
विद्यार्थ्याच्या चुलत्याने पोलिसांत तक्रार दिली आहे. काका किशोर मेघवाल यांच्या म्हणण्यानुसार, आपल्या माठातील पाणी प्यायल्यामुळे छैल सिंह याने एवढा संताप व्यक्त केला की, त्याने इंद्रकुमारला बेदम मारहाण केली. मुलगा घरी आल्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल केले. यानंतर त्याला उदयपूरमध्ये नेले. प्रकृती गंभीर झाल्यानंतर त्याला अहमदाबादमध्ये हलवण्यात आले. शनिवारी त्याने अखेरचा श्वास घेतला. आरोपीला गावातून ताब्यात घेण्यात आले आहे.
मारहाणीमुळे कानाखाली झाली होती गंभीर जखम
एमआरआयमध्ये इंद्रच्या कानाखाली गंभीर जखम झाल्याचे दिसून आले. रुग्णालयाच्या एक व्हिडिओत तो बोलण्याच्या स्थितीतही दिसत नव्हता. कुटुंबीयांनी विचारल्यावर कानाला हात लावून तो मारहाणीचा इशारा करताना दिसतो. छैलसिंहचे नाव घेतल्यावर तो कानाला हात लावून मारल्याचे खुणावतो.
दलित विद्यार्थ्याच्या मृत्यूच्या निषेधार्थ काँग्रेस आमदाराचा राजीनामा
या घटनेच्या निषेधार्थ सत्ताधारी काँग्रेस पक्षाचे आमदार पानाचंद मेघवाल यांनी राजीनामा दिला आहे. देश आणि राज्याच्या व्यवस्थेला दोष देत आमदार मेघवाल यांनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याकडे आपला राजीनामा पाठवला आहे. मेघवाल यांनी या पत्रात म्हटले आहे की, भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष पूर्ण झाले, देशात मोठ्या उत्साहात स्वातंत्र्यदिन साजरा होत आहे. असे सले तरी राज्यात दलित आणि वंचित वर्गावर सातत्याने अन्याय आणि अत्याचार होत असल्याचे त्यांनी सांगितले.
घोडीवर चढण्यास मनाई तर मिश्या ठेवण्यास विरोध
आमदार पानाचंद मेघवाल यांनी आपल्या राजीनाम्यात म्हटले आहे की, राज्यात दलितांना माठातून पाणी पिण्यास मनाई आहे. तर काही ठिकाणी घोडीवर चढण्यास मज्जाव केला जातो. तर काही ठिकाणी दलितांनी मिशा ठेवल्यास जिवे मारले जाते. चौकशीच्या नावार इथली फाईल तिकडे केली जाते आणि न्यायालयीन प्रक्रिया अडकवली जाते. गेल्या काही वर्षांत दलितांवर अत्याचार वाढत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात दलित आणि वंचितांसाठी जो समनातेचा अधिकार दिला त्याचे रक्षण करणारे कोणीच नाही असे दिसत आहे असेही मेघवाल म्हणाले.
आपल्याच सरकारवर प्रश्नचिन्ह
आमदार पानाचंद मेघवाल यांनी आपल्या राजीनाम्यात आपल्या सरकारला प्रश्न विचारले आहेत. दलितांच्या अत्याचारांच्या प्रकरणांवर बहुतांश वेळी गुन्हा दाखल होतो परंतु विधानसभेत यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतरही पोलीस काहीच कारवाई करत नाही असे सांगून मेघवाल यांनी आपलाच सरकारला खडेबोल सुनावले आहेत.