(रत्नागिरी)
शहरानजीकच्या मिरजोळे पाटीलवाडी येथे बेकायदेशीरपणे गावठी हातभट्टीची दारू विक्री करणाऱ्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई बुधवार, ५ जुलै रोजी सकाळी ८ वा. करण्यात आली. चेतन धोंडू सकपाळ असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.
बुधवारी सकाळी शहर पोलिसांना मिरजोळे-पाटीलवाडी येथे बेकायदेशिरपणे गावठी दारूची विक्री होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार, शहर पोलिसांनी त्याठिकाणी धाड टाकली असता त्यांना संशयित चेतन सकपाळ हा गैरकायदा, बिगर परवाना गावठी हातभट्टीची दारू बनवण्यासाठी लागणारे गुळ व नवसागरमिश्रित कुजके रसायन तसेच इतर साहित्य आणि गावठी दारू विक्रीसाठी जवळ बाळगून ठेवलेले असताना पोलिसांना मिळून आला. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.