(मुंबई)
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महायुती सरकारसाठी गेम चेंजर ठरली आहे. लोकसभा निवडणुकीतील अपयशानंतर महायुती सरकारनं जुलै 2024 पासून ही योजना लागू करत असल्याची घोषणा केली. ज्या महिला या योजनेसाठी अपात्र आहेत, ज्या महिला योजनेच्या निकषात बसत नाहीत, त्या देखील या योजनेचा लाभ घेत असल्याचं सरकारच्या निर्दशनास आलं होतं. त्यानंतर आता सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. याबाबत मंत्री आदिती तटकरे यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत ही माहिती दिली.
या महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही
आदिती तटकरे यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले, दिनांक २८ जून २०२४ व दिनांक ३ जुलै २०२४ रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेतून वगळण्यात येत आहे.
अपात्र ठरविण्यात आलेल्या निकषांप्रमाणे संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असलेल्या २,३०,००० महिलांना वगळण्यात आले आहे. तसेच वय वर्षे ६५ पेक्षा जास्त असलेल्या १,१०,००० महिलांना योजनेतून अपात्र ठरविले गेले आहे. कुटुंबातील सदस्यांच्या नावे चारचाकी गाडी असलेल्या, नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या आणि स्वेच्छेने योजनेतून नाव मागे घेणाऱ्या १,६०,००० महिला आहेत. यानुसार एकूण पाच लाख महिला आता अपात्र ठरल्या आहेत.
दरम्यान आमचं सरकार आलं तर आम्ही या योजनेतील लाभार्थी महिलांना 2100 रुपये देऊ अशी घोषणा महायुतीच्या नेत्यांकडून विधानसभा निवडणुकीपूर्वी करण्यात आली होती. त्यामुळे आता 2100 रुपये कधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर लाडक्या बहिणींना या योजनेंतर्गत 2100 रुपये मिळण्याची शक्यता आहे. आतापर्यंत योजनेचे सात हप्ते वितरीत करण्यात आले आहेत. फेब्रुवारी महिन्याचा हप्ता लवकरच देण्यात येणार आहे.
विधानसभा निवडणुकांआधी जाहीर केलेल्या अनेक योजनांचा मोठा आर्थिक ताण शासकीय तिजोरीवर येत असल्याची ओरड होत होती. यासाठी इतर योजनांचा निधी कमी केला असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. तसेच अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर शिवभोजन थाळी आणि आनंदाचा शिधा या दोन योजना बंद करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती.