(पाचल / तुषार पाचलकर)
गेल्या काही महिन्यापासून पाचल परिसरात मोकाट गुरांनी ग्रामस्थांना, व्यापाऱ्यांना त्रस्त करून सोडलं आहे. दुकानातील सामानाचे नुकसान, वाहतूकीस अडथळा, शेतकऱ्यांचे नुकसान तर शाळकरी मुलांना भर रस्त्यात जखमी करणं, यामुळे अनेक नागरिक हैराण झाले आहेत. पाचल ग्रामपंचायत कमिटी वारंवार सांगून देखील जनावरांचे मालक या बाबीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे.
नुकतेच पाचल येथील राजश्री राजाराम आजविलकर, वय वर्ष 65 या महिलेला गंभीररीत्या जखमी केलं. त्यांना तात्काळ सिव्हिल हॉस्पिटल रत्नागिरी दाखल करण्यात आले आहे. या गंभीर घटनेची त्वरित दखल घेऊन पाचल ग्रामपंचायत कमिटीने सर्व जनावरांच्या मालकांना नोटीसा काढल्या व ग्रामपंचायत कार्यालयात बोलावून मोकाट गुरांबाबतचा कायदा समजावून सांगितला. मात्र अद्यापही बाजारपेठेत मोकाट गुरं फिरताना दिसत आहेत. यावर उपाय म्हणून ग्रामपंचायत सदस्य श्री संजय पाथरे यांनी बाबा खानविलकर, श्री लवू, श्री विनोद पवार यांच्या सहाय्याने बाजारपेठेत मोकाट गुरांना बांधून ठेवली व मालकांना बोलावून त्या गुरांना त्यांच्या स्वाधीन केलं. शिवाय त्यांच्यावर दंड देखील आकारण्यात आला.
दुसरीकडे सरपंच श्री बाबालाल फरास यांनी देखील रविवारी, परवानगी न घेता लावलेले बॅनर हटवण्यास सांगितले. पाचल बाजारपेठेत कोणीही येतो आणि कुठेही कसेही जाहिरातीचे बॅनर भर रस्त्यात, रस्त्याच्या बाजूला लावून जातो, ज्यामुळे वाहन चालकांना त्याचा त्रास सहन करावा लागतो. याबाबत ग्रामपंचायतकडे काही तक्रारी आल्या होत्या. त्या तक्रारींची दखल ग्रामपंचायत पाचलचे सरपंच श्री बाबालाल फरास यांनी रविवारी दुपारी ग्रामपंचायत लिपिक श्री सुहास बेर्डे, कर्मचारी बाबा गोसावी, सुभाष काळे यांच्या सहाय्याने पाचल बाजारपेठेतील अनधिकृत बॅनर हटवण्यास सांगितले. आणि जर कोणी परवानगी न घेता बॅनर लावले तर त्यांच्यावर दंड आकारून तो वसुल केला जाईल असंही त्यांच्याकडून सांगण्यात आले. अजूनही काही धाडसी निर्णय या कमिटीकडून अपेक्षित आहेत, अशी चर्चा ग्रामस्थांकडून ऐकण्यात आली, यामध्ये गावठी दारूबंदी, अनधिकृत बांधकामं, व इतर अवैद्य धंदे असे विषय असतील असे समजते.
एकंदरीत ग्रामपंचायत पाचलच्या या कमिटीला निवडून येऊन सहा महिन्याचा कालवधी लोटला असेल. परंतु सध्या ज्या पद्धतीने विकास कामे ही कमिटी करत आहे, ते पाहता सध्या ग्रामपंचायत पाचल अक्शन मोड वर आली आहे असं म्हणायला हरकत नाही.