(पाचल / वार्ताहर )
राजापूर तालुक्यातील सर्वात मोठी समजल्या जाणाऱ्या पाचल ग्रामपंचायत हद्दीतील वाहतूक व्यवस्था, अवैध धंदे, आणि अनधिकृत बांधकाम रोखण्यास स्थानिक प्रशासनाला अपयश आले आहे. लाखो रुपये खर्च करून बसविण्यात आलेली शुद्ध जल मशीन धूळ खातं पडली आहे. ग्रामपंचायतच्या उदासीन कारभाराचा फटका मात्र सामान्य नागरिकांना बसत आहे. गतवर्षी एप्रिल महिन्यात चालू केलेली ही मशीन अद्याप बंद आहे. या मशीन साठी जवळपास पावणेचार लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. मात्र अद्यापही ग्रामस्थांना शुद्ध पाणी मिळालेले नाही.
पाचलच्या नागरिकांना स्वस्तात शुद्ध व थंड जल पुरवठा व्हावा म्हणून जल शुद्ध मशीन गेल्या वर्षी करण्यात आली होती. त्या मशीनचा वापर होतं नसल्याने गेले काही महिने मशीन धूळखात पडली आहे.
स्मार्ट ग्राम पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतच्या हद्दीत दिवसेंदिवस अनधिकृत बांधकामं होतं आहेत, अशा वेळी स्थानिक प्रशासन आणि बांधकामं विभागाने झोपेचे सोंग घेतलं आहे की काय असा प्रश्न उपस्थित होतं आहे.
अनधिकृत बांधकामासहित ग्रामपंचायत हद्दीत कचऱ्याचे साम्राज्य देखील वाढत आहे. यामुळे ग्रामस्थांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. कचऱ्यांची विल्हेवाट लावण्यासाठी ग्रामपंचायत पाचलने लाखो रुपये खर्च करून घंटा गाडी खरेदी केली. परंतू गेल्या चार महिन्यापासून ती ग्रामपंचायत इमारती खाली अशीच उभी आहे. बाजारपेठेत नो पार्किंगचे बोर्ड लावण्यात आले आहेत, परंतू ते फक्त शो साठी आहेत. कोणीही येतो कुठेही गाडी पार्क करून जातो. नो पार्किंग झोन मधील वाहनधारकांवर कोणतीच कारवाई होताना दिसत नाही.
बाजारपेठेत पोलीस चौकी आहे, परंतु त्या पोलीस चौकीत कोणी बसत नसल्याने आजूबाजूला बऱ्याच वेळा कचरा साचलेला असतो. चौकीच्या बाजूला कार्यक्रमाचे काही बॅनर लावले जातात. नो पार्किंग चा बोर्ड असून देखील त्या ठिकाणी गाड्या पार्क केल्या जातात , अश्या वेळी फक्त दिखावा म्हणून पोलीस चौकी आहे का? असा प्रश्न उभा राहतो.
पाचल गावच्या काही वाड्यात जाणारे रस्त्यांची दुरवस्था पाहायला मिळतेय. वर्ष होऊन गेलेय रस्त्यासाठी निधी मंजूर झाला परंतू अद्याप रस्त्यांच्या कामाला सुरवात नाही. वस्त्यामध्ये, वाड्यामध्ये घरांचे भाग रस्त्यावर आलेले पाहायला मिळत आहेत. त्यांच्यावर अद्याप कोणतीच कारवाई नाही. मोकाट गुरांबाबत कित्येक अर्ज, आंदोलन करून देखील अद्यापही मोकाट गुरांचा प्रश्न मार्गी लागला नाही. गावठी दारू, मटका, झुगार असे प्रकार ग्रामपंचायत हद्दीत सर्रास चालू आहेत तरी देखील याबाबत कोणतीच कारवाई नाही. हे सर्व पाहून स्मार्ट ग्राम पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतीत हे चाललय तरी काय? असा सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे.