(मुंबई)
देशात घातपाती कारवायांसाठी टेरर फंडिंग करणाऱ्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया PFI संघटनेच्या म्होरक्यांना एनआयए आणि ईडी या केंद्रीय तपास यंत्रणेने अटक केल्याच्या निषेधार्थ पीएफआयच्या कार्यकर्त्यांनी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. देशविरोधी घोषणा देणाऱ्या ६० ते ७० जणांवर पुणे पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर शुक्रवारी हे आंदोलन करण्यात आले होते.
त्यावेळी पाकिस्तान झिंदाबाद, अल्लाहू अकबरचे नारे लावले. या प्रकरणी बंड गार्डन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आता यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आक्रमक बनले आहेत. अशा घोषणा देणाऱ्यांना सरकारने वेळीच ठेचून काढले पाहिजे, अशी संतप्त प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.
एनआयएने छापे घातले आणि पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) च्या पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना अटक केली, म्हणून पुण्यात ह्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी, ‘पाकिस्तान झिंदाबाद, अल्लाहू अकबर’ अशा घोषणा दिल्या. सरकारने ह्यांना वेळीच ठेचले पाहिजे. ही अटक कशासाठी झाली? तर दहशतवाद्यांना आर्थिक मदत करणे, त्यांची प्रशिक्षण शिबिरे आयोजित करणे, ह्या गंभीर आरोपांखाली…थोडक्यात देशद्रोही कृत्यांसाठी. तरीही ह्या देशद्रोह्यांचे समर्थन करत जर ह्या PFI च्या कार्यकर्त्यांना त्यांचा धर्म आणि पाकिस्तान आठवत असेल, तर तुमचा धर्म घ्या, आणि पाकिस्तानात चालते व्हा. ही थेरं आमच्या देशांत चालणार नाहीत, असा ईशारा राज ठाकरे यांनी दिला आहे.
माझी केंद्रातील आणि राज्यातील गृहमंत्र्यांना विनंती आहे की, फक्त ह्या देशद्रोह्यांनाच नव्हे तर त्यांच्या ह्या समर्थकांना पण अशी अद्दल घडवा की, यापुढे पाण्यासाठी देखील ( पा ) उच्चारता येणार नाही, नाहीतर आता ह्या देशातील हिंदू बांधव गप्प बसणार नाहीत, असेही राज ठाकरेंनी म्हटले. हिंदुस्थानातील हिंदूंच्या आणि महाराष्ट्रातील हिंदू मरहट्ट्यांच्या मुठी जर आवळल्या तर ह्या हरामखोरांना कुठे पाय लावून पळायला लागेल हे मला सांगायला लावू नका. ह्या सगळ्याने उगाचच सणासुदीच्या काळात अशांतता पसरेल. त्यापेक्षा ही कीड समूळ नष्टच करा, ह्यातच हिंदुस्थानाचं हित असल्याचं राज ठाकरेंनी पोस्टद्वारे म्हटलं आहे.