(मुंबई)
पाकिस्तानात अडकलेल्या आपल्या कुटुंबियांच्या सुटकेसाठी एका बॉलिवूड दिग्दर्शकानं हायकोर्टाचे दरवाजे ठोठावले आहेत. त्याने कोर्टात दखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे की, आपली बायको मुलांसह तिच्या आईवडिलांना भेटण्यासाठी लाहोरमध्ये गेली ती परत येतच नाही. तिथं तिचं ब्रेनवॉश झाल्याचा संशय याचिकाकर्ता पतीनं व्यक्त केला आहे. तसेच आपल्या दोनपैकी एका मुलाचा पासपोर्ट संपला असून दुस-याच्या पासपोर्टचा कालावधीही संपत आलेला आहे. त्यामुळे भारत सरकारनं पाकिस्तानात अडकलेल्या आपल्या नागरिकांच्या सुटेकसाठी तातडीनं प्रयत्न करावेत, अशी मागणी या याचिकेतून दिग्दर्शकाने केली आहे.
या याचिकेची दखल घेत हायकोर्टानं केंद्र सरकारच्या परदेश मंत्रालयाला भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश देत सुनावणी 29 ऑगस्टला घेण्याचं निश्चित केलं आहे. मुश्ताक नाडियाडवाला अस याचिकाकर्त्यांच नाव आहे. त्यांनी पाकिस्तानी नागरीक मरियम चौधरी यांच्याशी 2012 मध्ये विवाह केला. कालांतरानं मरियम यांनी भारतीय नागरिकत्वासाठी अर्जही केला होता. नोव्हेंबर 2020 मध्ये मरियम आपल्या आजारी पालकांना भेटण्यासाठी दोन्ही मुलांसह पाकिस्तानला गेल्या.
त्यानंतर त्यांनी अचानक फेब्रुवारी 2021 मध्ये आपल्या मुलांच्या एकल पालकत्वासाठी लाहोर कोर्टात याचिका दाखल केली. आणि कोर्टानं ती मान्यही केली. अचानक आपल्या बायकोचं हे मतपरिवर्तन का झालं?, याची काहीही कल्पना नाही अस याचिकाकर्त्याच म्हणणं आहे. मात्र ती आता मुलांसह भारतात येण्यास तयार नाही. तिचे आईवडील तिथले वजनदार व्यक्तिमत्व आहेत, त्यांनीच तिच ब्रेनवॉश केलं असावं असा आरोप या याचिकेतून नाडियाडवाला यांनी केला आहे.