(रत्नागिरी)
पांढरा समुद्र येथील समुद्रात बुडालेल्या तरुणाचा मृतदेह 48 तासानंतर भाटिमिऱ्या आंबरेवाडी समुद्रकिनारी मिळून आला. उधाणलेल्या समुद्रात ही घटना घडल्याने मृतदेह छिन्न विच्छिन्न अवस्थेत मिळून आला.
सोमवारी 15 ऑगस्ट असल्याने सर्व आस्थापना बंद होत्या फिनोलेक्स कॉलनी शेजारी कोस्ट गार्डच्या रहिवासी इमारतीचे काम सुरू आहे. या ठिकाणी मजूर म्हणून कामाला असलेले तीन तरुण समुद्र स्नानाचा आनंद लुटण्यासाठी पांढरा समुद्र येथे दाखल झाले मद्यधुंद अवस्थेत हे तरुण समुद्रावर आले होते. समुद्राच्या पाण्यात सेल्फीसह व्हिडिओकरण सुरू होते. त्यांचा तोल जात असताना ते पाण्यात उड्या मारत होते.
त्यातील एक तरुण हा मोबाईलवर चित्रीकरण करीत होता. तर दोघेजण धुंद अवस्थेत समुद्रात लाटांवर उड्या मारत होते. बघता बघता त्यातील एक जण पाण्यात ओढला गेला आणि अचानक गायब झाला. तो बुडत असताना त्याचा एक हात वर दिसत होता काही ग्रामस्थांनी दुरून तो बुडताना पाहिला मात्र ते समुद्रकिनारी पोहोचेपर्यंत फार उशीर झाला होता.
मुरुगडा परिसरातील ग्रामस्थांनी समुद्रावर धाव घेतली. त्यातील दोघांना पाण्यातून बाहेर काढले. त्यातील अमन खान तरुण नशेमध्ये फार बेधुंद झाला होता. त्याच्या शेजारी असलेला त्याचा सहकारी अमीर खान हा कधी बेपत्ता झाला हे त्याला कळलेच नाही. ग्रामस्थांनी त्यातील दोघांना पाण्यातून बाहेर आणले आणि त्यांची विचारपूस सुरू केली. त्यावेळी आपण फिनोलेक्स कॉलनी शेजारी कोस्ट गार्डच्या रहिवासी मातीचे बांधकाम करत असल्याचे सांगून त्याच ठिकाणी राहिला असल्याचे त्यांनी सांगितले. याबाबतची माहिती तात्काळ शहर पोलीस निरीक्षक विनीत चौधरी यांना देण्यात आले पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.
दरम्यान समुद्रात बुडालेल्या तरुणाचा मृतदेह ४८ तासानंतर भाटिमिऱ्या आंबरेवाडी समुद्रकिनारी लागला. सकाळी 9 च्या सुमारास येथील रहिवाश्यांना पाण्यात मृतदेह तरंगताना दिसून आला. त्यांनी त्याबाबतची माहिती शहर पोलिसांना दिली. त्यानंतर ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला.