(लंडन)
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ७ जून पासून सुरू झाला आहे. दोन्ही संघ ही स्पर्धा जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरले आहेत. टीम इंडियाने सलग दुसऱ्यांदा टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. तर ऑस्ट्रेलिया पहिल्यांदाच WTC फायनल खेळत आहे. पहिल्या दिवसावर ऑस्ट्रेलियाने वर्चस्व गाजवत मोठी धावसंख्या उभारली. ऑस्ट्रेलियाने पहिल्या दिवशी ३ बाद ३२७ धावा केल्या. ट्रॅविस हेड आणि स्टीव्ह स्मिथने चौथ्या विकेटसाठी नाबाद २५१ धावांची भागीदारी रचली. हेडने नाबाद १४६ तर स्मिथने नाबाद ९५ धावा केल्या.
भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करत ऑस्ट्रेलियाला लंचपर्यंत दोन धक्के दिले. पहिल्या दिवशीच्या पहिल्या सत्राचा खेळ थांबला, त्यावेळी ऑस्ट्रेलियाने २ बाद ७३ धावा केल्या होत्या. भारताकडून मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली तर डेव्हिड वॉर्नरने ६० चेंडूत ४३ धावा करत मार्नस लाबुशेनसोबत दुस-या विकेटसाठी ६९ धावांची भागीदारी रचली. मार्नस २६ धावांवर नाबाद होता.
लंचनंतर मोहम्मद शमीने मार्नसचा त्रिफळा उडवत कांगारूंना मोठा धक्का दिला. मात्र या धक्क्यातून स्टिव्ह स्मिथ आणि ट्रॅविस हेडने संघाला सावरले. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी रचली. हेडने आक्रमक फलंदाजी केली तर स्मिथ त्याला एका बाजूने साथ देत होता. या दोघांनी संघाला दीडशतकी मजल मारून दिली.
चहापानंतर स्टीव्ह स्मिथने आपले अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर आक्रमक फलंदाजी करणा-या ट्रेविस हेडने शतकी मजल मारली. त्यांनी चौथ्या विकेटसाठी नाबाद दीडशतकी भागीदारी रचत संघाला २०० पार पोहचवले. जसजसा पहिला दिवस समाप्तीकडे जात असताना या दोघांनी ऑस्ट्रेलियाला २५० च्या पुढे पोहचवले.
दिवस अखेरपर्यंत स्मिथ आणि हेडने आपली भागीदारी २५१ धावांपर्यंत पोहोचवली. ऑस्ट्रेलियाने दिवसाचा खेळ संपला तेव्हा ८५ षटकात ३ बाद ३२७ धावा केल्या होत्या. ट्रेविस हेड १४६ धावा करून तर स्मिथ ९५ धावा करून नाबाद होते. भारताकडून मोहम्मद समी, मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली. ट्रेविस हेडने शतकी तर स्मिथने अर्धशतकी खेळी करत चौथ्या विकेटसाठी नाबाद दीडशतकी भागीदारी रचली. याचबरोबर ऑस्ट्रेलियाने चहापानानंतर २३० धावांच्या पार पोहचवले.