(रायगड)
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या इशार्यानुसार रविवारी हजारो मनसैनिकांनी वेगवेगळ्या रस्त्यांवर पदयात्रा काढत मुंबई-गोवा महामार्गाला विळखा घातला. त्यानंतर सायंकाळी कोलाडला राज ठाकरेंची सभा झाली. या सभेत ‘पहिल्यांदा हात जोडून जा, ऐकले नाही तर हात सोडून जा’ हे आपल्या पक्षाचे धोरण आहे. आज शांततेत पदयात्रा काढली. पुढील आंदोलन शांततेत होणार नाही, असे म्हणत त्यांनी राज्य सरकारला इशारा दिला. मुंबई-गोवा महामार्ग न सुधारण्यामागे मोठे अर्थकारण आहे, असेही त्यांनी सांगितले. अमित ठाकरे यांनी यात्रेचं नेतृत्व केलं. मनसेच्या या जागर यात्रेत कोकणातील असंख्य नागरिक सहभागी झाले. मोठ्या प्रमाणात कोकणकरांनी हजेरी लावल्याने मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी कोलाडमध्ये झालेल्या सभेत सर्वांचे आभार मानले. इतकंच नाही, तर राज ठाकरे यांनी गेली अनेक वर्ष या महामार्गाचं काम का रखडलंय याचं कारण सांगत मोठा दावा केलाय.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पदयात्रा हा आंदोलनाचा सभ्य मार्ग आहे. सरकारला जाग आणण्यासाठी मनसेचे हे आंदोलन असल्याचे मत मनसे प्रमुख राज ठाकरे म्हणाले. रस्त्यावर पडलेला खड्डा भरता येतो, पण गेलेलं माणसाचं आयुष्य परत भरता येत नसल्याचे राज ठाकरे म्हणाले. मुंबई-गोवा महामार्गाची चाळण झाली आहे. या मुद्यावरुन राज ठाकरेंनी सरकारवर जोरदार टीका केली. कोकणी बांधवांनी जमिनी विकू नयेत असे आवाहन देखील राज ठाकरे यांनी केले.
यावेळी राज ठाकरे यांनी आक्रमक होण्याचा अप्रत्यक्षपणे आदेश देत म्हटले, आता लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी आम्ही ही यात्रा शांततेत काढत आहोत. मात्र, यापुढची यात्रा शांततेत नसणार. आमच्यावर किती केसेस करायच्या त्या करा. अत्यंत कमी भावात तुमच्या जमिनी विकत घेतल्या जात आहेत. रस्ता झाला की, चांगल्या किमतीमध्ये या जमिनी विकतील आणि पैसा कमावतील. तुम्ही तसेच राहाल. यात आपलेच लोक सहभागी आहेत. हे सर्व टाळण्यासाठी आपल्या जमिनी व्यापार्यांना विकू नका, असे ते म्हणाले.
गोवा महामार्गाच्या कामाला 17 वर्षांत 15,566 कोटी रुपये खर्च झाले आहेत. या महामार्गावर खड्ड्यांमुळे 2500 लोकांचा जीव गेला आहे. रस्त्यावर पडलेले खड्डे भरता येतात, पण माणसाचे आयुष्य भरता येत नाही. पण तुम्हाला या गोष्टींचा राग येत नाही. त्याच त्याच पक्षाला आणि त्यांच्या उमेदवारांना निवडून देता. त्यामुळे त्यांनी तुम्हाला गृहीत धरले आहे. जगात पेव्हरब्लॉकचे रस्ते कुठे पाहिले आहेत का? पेव्हरब्लॉक फूटपाथसाठी वापरतात. पण इथे मात्र पेव्हरब्लॉकचे रस्ते बनवले जातात. त्यामुळे ते पुन्हा पुन्हा खराब होतात. ते दुरुस्ती करण्यासाठी सारखी टेंडर निघतात. अशा प्रकारे तुमचा पैसा लुटला जातो. मुंबई – गोवा महामार्गावरील खड्ड्यांंच्या विरोधात आंदोलन करणार्या माझ्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करून त्यांना पोलीस ठाण्यात अंडरवेअरवर बसवले. पण अंडरवेअरची रिटर्न गिफ्ट मीही देऊ शकतो, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला.
राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली एक पदयात्रा निघाली. शर्मिला ठाकरे म्हणाल्या की, रस्ता व्यवस्थित बांधला, रुग्णवाहिका, टॉयलेट आदी सोयी केल्या की, मग या सर्व सुविधा देऊन रस्त्याच्या देखरेखीसाठी टोल घ्यायचा असतो. पण या कोणत्याच सोयी न देता आधी टोलनाके उभारुन टोल वसुली सुरू केली आहे.
अमित ठाकरे यांनी पळस्पे फाटा ते खारपाडा या 16 किलोमीटर पदयात्रा काढली. यावेळी वाटेतील खड्ड्यांमध्ये त्यांनी कागदाच्या बोटी सोडून निषेध करीत पुढील यात्रा ही शांततेत नसेल असा इशारा दिला. एका पदयात्रेत यममार्गाकडे लक्ष खेचण्यासाठी यमाच्या वेषात मनसैनिक सामील झाला होता. बाळा नांदगावकर हे मनसैनिकांसह तरण कोप ते कासू हे 12 किलोमीटर अंतर चालले. संदीप देशपांडेंचा मोर्चा निवळीहून 12 किलोमीटर गेला तर राजू पाटील हे नागोठणे ते खांबा 15 किलोमीटर अंतर कापत आंदोलनात सहभागी झाले. मनसैनिक रस्त्यावर उतरल्याने यावेळी वातावरण चांगलेच तापले होते.