(नवी दिल्ली)
भारतात कृत्रिम बुद्धिमत्तेवरील ‘ग्लोबल इंडिया एआय २०२३’ ही पहिली परिषद होणार आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाकडून या परिषदेचे आयोजन करण्यात येणार आहे. ही परिषद १४ आणि १५ ऑक्टोबर रोजी करण्याचे प्राथमिक पातळीवर नियोजित आहे. यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) क्षेत्रातील धुरीण, संशोधक, स्टार्टअप्स आणि भारतातील आणि जगभरातील गुंतवणूकदार सहभागी होणार आहेत.
या परिषदेत एआय क्षेत्राशी संबंधित व्यापक विषयांचा समावेश असेल. पुढील पिढीसाठी एआय प्रशिक्षण आणि प्राथमिक मॉडेल्स, आरोग्य सेवा, प्रशासन आणि पुढील पिढीच्या विद्युत वाहनांमधील एआयचा वापर, भविष्यातील एआय संशोधन पद्धती, एआय संगणकीय प्रणाली, गुंतवणुकीच्या संधी आणि एआय प्रतिभेचे संगोपन या विषयांचा यात समावेश असेल. केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर या परिषदेच्या सुकाणू समितीचे अध्यक्ष आहेत. ही समिती ग्लोबल इंडिया एआय २०२३ ची रुपरेषा तयार करण्याची जबाबदारी पार पाडेल, असे चंद्रशेखर यांनी सांगितले. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या डिजिटल अर्थव्यवस्था सल्लागार गटाचे सदस्य आणि कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्राशी संबंधित महत्त्वाच्या व्यक्तींचा या समितीत समावेश आहे.