( प्रतिनिधी / रत्नागिरी )
तालुक्यातील साठरेबांबर येथे पहिलीत शिकणाऱ्या ३ मुलींशी गैरकृत्य करणाऱ्या शिक्षकाला न्यायालयाने ५ वर्षे सश्रम कारावास व २ हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. रमेश रतन जाधव (५१, रा. पोचरी ता. संगमेश्वर) असे शिक्षा सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे.
रत्नागिरी अतिरिक्त सत्र व विशेष पॉक्सो न्यायाधीश वैजयंतीमाला आबासाहेब राऊत यांनी या खटल्याचा निकाल दिला. सरकारी पक्षाकडून अॅड. अनुपमा ठाकूर यांनी काम पाहिले. खटल्यातील माहितीनुसार आरोपी रमेश जाधव हा साठरेबांबर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक म्हणून काम करत होता. २४ डिसेंबर २०२१ रोजी दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास शिक्षक रमेश जाधव याने पहिलीत शिकणाऱ्या ६ वर्षीय ३ मुलींसोबत गैरकृत्य केले. असा आरोप ठेवण्यात आला होता.
शाळेमध्ये घडलेली ही घटना पिडीत मुलींनी घरी आल्यानंतर आपल्या पालकांना सांगितली होती. या घटनेनंतर परिसरात तीव्र पडसाद उमटले होते. तसेच पालकांच्यावतीने शिक्षक रमेश जाधव याच्याविरूद्ध रत्नागिरी ग्रामीण पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानुसार पोलिसांनी भादंवि कलम ३५४.३५४(अ) तसेच बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ८.१० व १२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच गुन्ह्याचा तपास करून पोलिसांनी रमेश जाधव याच्याविरूद्ध आरोपपत्र न्यायालयापुढे सादर केले.
खटल्यादरम्यान एकूण १३ साक्षिदार सरकारी पक्षाकडून तपासण्यात आले. आरोपी रमेश जाधव याच्याविरूद्ध दोषारोप सिद्ध झाल्याने त्याला ५ वर्षे सश्रम कारावास व ६ हजार रूपये दंडाची शिक्षा न्यायालयाने ठोठावली. न्यायालयापुढे पैरवी अधिकारी म्हणून ग्रामीण पोलीस ठाण्यातील पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील आयरे यांनी काम पाहिले