(रत्नागिरी)
सर्वोदय छात्रालय होते म्हणूनच येथे शिस्त, काटकसर व संस्कारित झालो. त्यामुळे रा. प. महामंडळात विविध पदांवर काम करताना त्या त्या ठिकाणी शिस्तबद्ध व प्रामाणिकपणे काम करून महामंडळाच्या कोट्यवधी रुपयांची बचत करू शकलो. छात्रालयात राहिलो म्हणूनच हे संस्कार होऊ शकले, असे प्रतिपादन शिवराम जाधव यांनी केले. पहिला सर्वोदय पुरस्कार स्वीकारल्यानंतर ते बोलत होते. दत्तमंगल कार्यालयात रविवारी दुपारी या पुरस्काराचे वितरण हरिश्चंद्र गीते यांच्या हस्ते करण्यात आले.
सर्वोदय छात्रालयाच्या १९ व्या छात्र मित्र मेळाव्याप्रसंगी या पहिल्या पुरस्काराचे वितरण केले. (कै.) सौ. हेमलता व हरिश्चंद्र गीते पुरस्कृत हा पुरस्कार जाधव यांना सन्मानपूर्वक प्रदान केला. शाल, श्रीफळ, मानपत्र, चषक आणि ११ हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप होते. पुरस्काराची सर्व रक्कम श्री. जाधव यांनी यमुनाबाई खेर ट्रस्टकडे सुपूर्द केली. या वेळी व्यासपीठावर विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष अॅड. संदीप ढवळ, व्यवस्था समितीचे अध्यक्ष गजानन चाळके, व्यवस्था समिती सदस्य बीना कळंबटे, रघुवीर शेलार, प्रमुख पाहुणे रमेश भाटकर आदी उपस्थित होते.
श्री. जाधव यांच्या कारकिर्दीचा आढावा घेताना जयश्री बर्वे यांनी मानपत्राचे वाचन केले. मालवण (जि. सिंधुदुर्ग) येथील जाधव हे सामान्य कुटुंबात जन्मले. त्यांनी शासकीय तंत्रनिकेतनमध्ये प्रवेश घेतला. परंतु राहण्याची व्यवस्था नसल्याने सर्वोदय छात्रालयात वास्तव्यास आले. छात्रालयात दररोज पाच वाजता उठून प्रार्थना, सर्व कामे करत. शिक्षणानंतर १९८० पासून ते रा. प. महामंडळात सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक म्हणून रुजू झाले. वरिष्ठ आगार व्यवस्थापक, कार्यशाळा उपअभियंता, यंत्र अभियंता (चालन), प्रादेशिक अभियंता अशा विविध पदांवर त्यांनी नोकरी केली. एसटी आगार फायद्यात आणले. गाड्यांची दुरुस्ती, इंधन बचत याकरिता त्यांना बक्षीसे मिळाली. लाईन चेकिंग सक्षम करून फुकट्या प्रवाशांवर दंडात्मक कारवाई केली. त्यांच्या या यशस्वी कारकिर्दीबद्दल पुरस्कार देऊन सन्मानित केले.
या कार्यक्रमात प्रातिनिधीक माजी विद्यार्थ्यांना गौरवण्यात आले. यामध्ये शिवप्रकाश चौघुले, डॉ. श्रीपाद कोदारे, किशोर ठूल, प्रकाश तेरवणकर, प्रकाश जाबरे, दयानंद परवडी, अॅड. मिलिंद लोखंडे, रघुवीर शेलार, नरेंद्र खानविलकर, पंकज बाणे, कमलाकर हेदवकर आणि अशोक निर्मळ यांचा समावेश होता.