(मुंबई)
यंदाचे उद्योग पुरस्कार जाहीर झाले असून पहिला उद्योगरत्न पुरस्कार पद्मविभूषण रतन टाटा यांना तर उद्योगमित्र पुरस्कार अदर पुनावाला यांना तसेच उद्योगिनी पुरस्कार गौरी किर्लोस्कर यांना, तर उत्कृष्ट मराठी उद्योजक पुरस्कार विलास शिंदे यांना जाहीर झाला आहे. महाराष्ट्राच्या उद्योग क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या नामवंत उद्योजकांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या धर्तीवर यावर्षीपासून राज्य शासनाने ‘महाराष्ट्र उद्योग पुरस्कार’ देऊन त्यांना सन्मानित करण्याचा निर्णय घेतला आहे.
पुरस्कार प्रदान सोहळा २० ऑगस्टला दुपारी २ वाजता वांद्रे -कुर्ला संकुलमधील जियो वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमधील जास्मिन हॉलमध्ये आयोजित करण्यात आला आहे.
या सोहळ्याला राज्यपाल रमेश बैस हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडेल. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, उद्योगमंत्री उदय सामंत यांची प्रमुख उपस्थिती असेल. मुख्य सचिव मनोज सौनिक, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विपीन शर्मा उपस्थित राहणार आहेत.
‘उद्योगरत्न’ पुरस्काराचे स्वरूप २५ लक्ष रुपये, सन्मानचिन्ह व मानपत्र असे आहे. ‘उद्योगमित्र’ पुरस्काराचे स्वरुप १५ लक्ष रुपये, सन्मानचिन्ह व मानपत्र, ‘उद्योगिनी’ पुरस्काराचे स्वरुप ५ लक्ष रुपये, सन्मानचिन्ह व मानपत्र तर ‘उत्कृष्ट मराठी उद्योजक’ पुरस्काराचे स्वरुप ५ लक्ष रुपये, सन्मान चिन्ह व मानपत्र असे आहे.