( निवोशी-गुहागर/उदय दणदणे )
ग्रामपंचायत उमराठच्यावतीने मंगळवार दि.२४ मे रोजी नवलाई देवीची सहाण येथे “पशुसंवर्धन दिन” ग्रामस्थ, शेतकर्यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात आणि आनंदाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत उमराठचे सरपंच जनार्दन आंबेकर, पोलीस पाटील वासंती आंबेकर, हेदवी पंचक्रोशीतील गावांची जबाबदारी (चार्ज) असलेले पशू वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल गोरे, डाॅ. पद्माकर हळदणकर, ग्रामपंचायत सदस्या कु. प्रज्ञा पवार, सहाय्यक नितीन गावणंग, रोजगार सेवक प्रशांत कदम आणि ग्रामस्थ शेतकरी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
सदर पशुसंवर्धन दिनाच्या दिवशी उपस्थित असलेले शेतकरी ग्रामस्थ रूपा गुणाजी आंबेकर व दामोदर बाळू आंबेकर यांचे पशूधन नंदीबैल याची त्यांच्या कुटुंबीयांनी बैलाला सजवून विधीवत पुजा करून बैलाला औक्षण केले. यावेळी सरपंच जनार्दन आंबेकर, पोलीस पाटील वासंती आंबेकर, ग्रामस्थ शेतकरी श्रीमती आनंदीबाई पांडुरंग आंबेकर, रामचंद्र देवजी आंबेकर, यजमान कुटूंबीय सौ. रेश्मा रूपा आंबेकर, सौ. रेणुका दामोदर आंबेकर, सौ. स्वरांगी स्विकार आंबेकर आणि सुकन्या कु. अभिज्ञा स्विकार आंबेकर उपस्थित होत्या.
श्री नवलाई देवीच्या सहाणेवर झालेल्या पशुसंवर्धन दिनानिमित्त कार्यक्रमात सुरुवातीला सरपंच जनार्दन आंबेकर यांनी उपस्थित सर्वांचे स्वागत करून पशुसंवर्धन दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. तसेच पशू वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल गोरे आणि डाॅ. पद्माकर हळदणकर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. पशुसंवर्धन दिनाबद्दल प्रस्तावना करताना सरपंच जनार्दन आंबेकर यांनी सांगितले की, पशुसंवर्धन करणे ही काळाची गरज असून ते खरे तर शेतकऱ्यांचे भाग्यचे आणि समृद्धीचे लक्षण आहे. हे एक लक्ष्मीचे ध्योतक आहे असे सांगून सर्वांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी पशुसंवर्धन दिनानिमित्त ग्रामस्थ, शेतकर्यांना मार्गदर्शन करताना पशू वैद्यकीय अधिकारी डाॅ. अमोल गोरे यांनी पशुसंवर्धनाचा पुर्व इतिहास सांगताना सांगितले की, ब्रिटिशांच्या कालावधीत महाराष्ट्रात सन १८९२ मध्ये पशुसंवर्धन विभागाची स्थापना करण्यात आली होती. त्यावेळी मुख्य पशूधन होते अश्व, जे ब्रिटिश फौजी प्रामुख्याने वापरत असत. मात्र त्या वेळी पशुसंवर्धन खात्याचा व्याप मर्यादित स्वरूपाचा होता.
पुढे स्वातंत्र्याच्या काळात सन १९४७ मध्ये कृषी खात्याकडील पशुसंवर्धन संस्थांचे पशुवैद्यक विभागाकडे हस्तांतरण करून पशुसंवर्धन तथा पशुवैद्यकीय विभाग म्हणून नामकरण करण्यात आले. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर राज्यात गायी-म्हशींचा विकास करण्यासाठी पैदास आणि धोरण आखण्यात आले. त्यानुसार राज्यात कृत्रिम रेतनाचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. कृत्रिम रेतनाचा मुख्य उद्देश हा जनावरांच्या जातींमध्ये सुधारणा करणे व उत्पादन क्षमता वाढविणे असा आहे. सद्या संकरित जनावरांची पैदास करून अधिक उत्पादन व आर्थिक लाभ मिळवून देण्यात येत आहे.
यावेळी पशू वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रद्माकर हळदणकर यांनी सुद्धा पशुसंवर्धनाचे असणारे वेगवेगळे फायदे, पशुसंवर्धन बाबतीत घ्यायची काळजी, पशूंची निगा, आहार, साथींच्या रोगराई पासून घ्यायची दक्षता, दुधदुभते कसे वाढवायचे इत्यादी महत्त्वपूर्ण विषयांवर मार्गदर्शन केले.
त्याचप्रमाणे कठीण परिस्थितीत सुद्धा जे शेतकरी माणुसकीची जपणूक व मुक्या प्राण्यांवर प्रेम करून पशुसंवर्धनाचे महान कार्य करत आहेत, अशा एकूण ४७ शेतकऱ्यांना पशू वैद्यकीय अधिकारी यांच्या हस्ते मोफत औषधे देण्यात आली तसेच ग्रामपंचायत उमराठच्या माध्यमातून सरपंच जनार्दन आंबेकर यांच्या हस्ते शेतकर्यांना पुष्पगुच्छ व गौरवपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. शेवटी सदस्या कु. प्रज्ञा पवार यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानून समारोप केला. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कु. प्रज्ञा पवार, नितीन गावणंग, प्रशांत कदम यांचे विशेष सहकार्य लाभले.