(गुवाहाटी)
शिवसेनेतील बंडखोरीने महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे. गेल्या आठवड्याभरात अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या आहेत. शिवसेनेचे मंत्रीही एकनाथ शिंदे यांच्या गटाला जाऊन मिळाले आहेत. आता शिवसेनेकडे केवळ आदित्य ठाकरे हे एकमेव मंत्री उरले आहेत. यातच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांना धमकीवजा इशाराही दिला आहे. दरम्यान, बंडखोर आमदार दीपक केसरकर यांनी आणखी एक दोन आमदार आमच्यासोबत येतील असा दावा केला आहे. एएनआयशी बोलताना केसरकर म्हणाले की, “आमची संख्या ५१ पर्यंत जाईल. शिंदे गटातील सर्व आमदार कोणत्याही वेळी महाराष्ट्र विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी तयार आहेत”
राज्यातील आणखी एक दोन आमदार आमच्यासोबत आल्यानंतर आमची संख्या ५१ होईल. यानंतर तीन ते चार दिवसात आम्ही निर्णय घेऊन थेट महाराष्ट्रात येऊ. तसंच फ्लोअर टेस्टसाठी आम्ही तयार आहे. मात्र आधी एकनाथ शिंदे यांच्या गटाला मान्यता मिळायला हवी. कोणत्याही परिस्थिती आम्ही महाविकास आघाडी सरकारसोबत जाणार नाही असंही केसरकर यांनी स्पष्ट केलं.
बंडखोर आमदार दीपक केसरकर यांनी कार्यालयांच्या होणाऱ्या तोडफोडीवरून प्रश्न उपस्थित केला आहे. तोडफोड करणाऱ्यांमध्ये किती शिवसैनिक आणि किती राष्ट्रवादीचे कार्यकर्ते? असं विचारत हे तपासून पहावं लागेल असं ते म्हणाले. पवारसाहेबांना उद्धव ठाकरे भेटल्यानंतर त्यांचे विचार बदलल्याचंही केसरकर यांनी म्हटलं.
शिवसेनेने दिलेल्या पत्रानंतर राज्याचे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी सर्व बंडखोर आमदारांना २७ जूनपर्यंत उत्तर देण्याची नोटीस पाठवली आहे. शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह एकूण १६ आमदारांना निलंबित करावं, त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई करावी अशी मागणी शिवसेनेनं केली होती. आता याविरोधात बंडखोर आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. यावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.