(नाशिक /प्रतिनिधी)
जागतिक तापमान वाढीचा धोका ओळखून परमपूज्य गुरुमाऊलींनी पर्यावरण संतुलनासाठी दिलेल्या सव्वाकोटी महावृक्षारोपण व संवर्धन अभियानात सर्वांनी सहभागी होऊन पर्यावरण मित्र म्हणून योगदान द्यावे असे आवाहन अखिल भारतीय श्री स्वामी स्वामी समर्थ सेवामार्गाच्या बालसंस्कार व युवा प्रबोधन विभागाचे प्रमुख श्री. नितीनभाऊ मोरे यांनी केले.
श्री. मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत रामशेज किल्ल्यावर महावृक्षारोपण आणि सीडबॉल उपक्रम राबविण्यात आला. त्यावेळी सेवेकर्यांना श्री. मोरे यांनी मार्गदर्शन केले. ते पुढे म्हणाले की, आज मानवाने निसर्गावर अतिक्रमण केले आहे. झाडांनी बेसूमार कत्तल होत असून पर्यावरणावर घाला घातला जात आहे. त्यामुळे गुरुमाऊलींच्या आज्ञेनुसार सेवामार्गाच्या बालसंस्कार व युवा प्रबोधन विभागातर्फे सव्वाकोटी महावृक्षारोपण आणि संवर्धन अभियान राबवले जात आहे. गतवर्षी तब्बल अकरा लाख रोपांची लागवड झाली. तर यंदाच्या वर्षी तब्बल 40 लाख रोपांची लागवड करण्याचे उद्दिष्ठ आहे.
अभियानाचे हे द्वितीय पर्व सुरु आहे. याबरोबरच सीडबॉल उपक्रमही सुरु आहे. संपूर्ण महाराष्ट्रासह देशातील काही राज्यात हे दोन्ही उपक्रम सर्व वयोगटातील सेवेकरी अत्यंत उत्साहाने यामध्ये सहभागी झाले आहे. वृक्षारोपण नंतर त्या रोपांची देखभाल – संवर्धनही केले जाते. त्यामुळे गुरुमाऊलींनी दिलेला हा आगळावेगळा उपक्रम असून या अभियानात सर्वांनी सहभागी व्हावे असा पुनरुच्चार त्यांनी केला.
300 झाडे व 3500 सीडबॉल
गुरुपुत्र श्री. नितीनभाऊ मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत रामशेज किल्यावर तिनशे रोपांची लागवड आणि 3500 सीडबॉल्स्चे रोपण करण्यात आले. नाशिकमधील पंचवटी, मखमलाबाद, म्हसरुळ आणि विवेकानंद नगर केंद्रातील दोनशेहून अधिक सेवेकरी अत्यंत उत्साहाने सहभागी झालेले होते. गावचे सरपंच साहेबराव मालेकर, उपसरपंच संदिप कापसे यांनी सहभागी होऊन सेवामार्गाच्या उपक्रमाचे कौतुक केले. काजू, पिंपळ, हनुमान फळ, पापडा, कांचन, हिरडा, जांभूळ, करंज, पंगारा, शेंद्री, शिरस आदी वृक्षांच्या रोपांची लागवड करण्यात आली.