( प्रतिनिधी / रत्नागिरी )
रत्नागिरीला महाराष्ट्रातील पर्यटनाच्या दृष्टीने स्थान आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी पर्यटन स्थळे आहेत. थिबा राजवाडा, जिजामाता उद्यान, गणपतीपुळे, भगवती बंदर, टिळक जन्मस्थान, पावस, गणेशगुळे तसेच कातळ शिल्प यांचेही आकर्षण वाढले आहे.
या माध्यमातून पर्यटकांचे लक्ष्य जिल्ह्याकडे वेधण्यासाठी पुरातत्व विभागाने पर्यटनाला चालना देण्यासाठी 20 कोटींचे प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर केले आहेत.
केरळ, गोवा येथील पर्यटनाच्या धर्तीवर आता वॉटर स्पोर्टस्, स्पीडबोट या नव्या संकल्पनांना उभारी मिळाली आहे. जिल्ह्याला प्राचीन, ऐतिहासिक वारसा लाभलेल्या अनेक वास्तू आहेत. त्याचे जतन केले तर पर्यटनालाही अधिक चांगल्या प्रकारे चालना मिळू शकते. जयगड, पूर्णगडसारख्या किल्ल्यांच्या दुरुस्तीसाठी शासनाने निधी दिल्यानंतर तेथेही पर्यटक आकर्षित होतील. दिवाळी, ख्रिसमस, मे महिना या सुट्टीच्या काळात लाखो पर्यटक कोकणात येतात. त्यांची पावले आपसुकच ऐतिहासिक ठिकाणांकडे वळतात. हे लक्षात घेऊन पुरातत्व विभागाकडून येथील ऐतिहासिक, प्राचीन स्थळांच्या विकासासाठीचे प्रस्ताव शासनाकडे सादर केले आहेत. मागीलवर्षी पुरातत्व विभागाकडून ऐतिहासिक पर्यटन स्थळं, किल्ले, राजवाडा यांचे जतन करण्यासाठी सुमारे 20 कोटीचे प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवले होते. मात्र त्याला निधी मिळाला नव्हता. आता नव्याने स्थापन होणार्या सरकारकडून या प्रस्तावांना निधी मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
- कातळशिल्प संरक्षण व सुशोभिकरणाचा साडेचार कोटींचा प्रस्ताव
- थिबापॅलेसमध्ये दालन उभारण्यासह अन्य डागडुजीसाठी 3 कोटी मागणीचा प्रस्ताव