(रत्नागिरी)
‘गाव तिथे मानसोपचार’ अंतर्गत “परीक्षेला सामोरे जाताना” या घोषवाक्यासह विविध शाळा कॉलेजमध्ये तसेच विविध गटांमध्ये जाऊन मनोविकारतज्ञ डॉ अतुल ढगे विद्यार्थ्यांमध्ये परीक्षेच्या ताण-तणावा विषयी दि 1 फेब्रुवारी ते 30 एप्रिल दरम्यान जनजागृती करणार आहेत.
राज्यभरातील समविचारी मानसोपचार तज्ञांनी एकत्र येऊन “गाव तिथे मानसोपचार- राज्यव्यापी मनस्वास्थ्य जनजागृती अभियान” ह्या अनोख्या समाजप्रबोधनपर उपक्रमाची सुरूवात केलेली आहे. या अभियानाचे चार टप्पे याआधी यशस्वीरित्या पार पडलेले आहेत. परीक्षेचा तणाव ही सामान्य बाब झाली असून परीक्षेच्या ताण तणावामुळे मुलांमध्ये व तरूणांमध्ये नैराश्याचे व आत्महत्येचे प्रमाण वाढत चालले आहे. हे लक्षात घेऊन पाचव्या टप्प्यात “परीक्षेला सामोरे जाताना” या घोषवाक्यासह विविध शाळा मध्ये जाऊन राज्यभरात जनजागृतीचा प्रयत्न केला जाणार आहे. इंडियन सायकियाट्रिक सोसायटी (वेस्टर्न झोन) व इंडियन मेडिकल असोसिएशन यांच्या सहयोगाने जवळपास 400 मानसोपचार तज्ञ या मोहिमेत सक्रिय काम करणार आहेत.
“गाव तेथे मानसोपचार” या राज्यव्यापी अभियानाचा एक अविभाज्य भाग असलेले डॉ अतुल ढगे रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना महाविद्यालये, शाळा येथे प्रत्यक्ष होणाऱ्या चर्चासत्रात मार्गदर्शन करणार आहेत. 1 फेब्रुवारी ते 30 एप्रिल दरम्यान आपल्या शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये हा कार्यक्रम आयोजीत करावयाचा असल्यास आपल्या जवळच्या मनोविकातज्ञाशी किंवा 9503421124 या नंबरवर संपर्क करण्याचे आवाहन मनोविकारतज्ञ व इंडियन मेडिकल असोसिएशन (आय.एम.ए.) रत्नागिरी शाखेचे सचिव व आय.एम.ए. (महाराष्ट्र) च्या मानसिक आरोग्य कमिटी चे सह-अध्यक्ष डॉ अतुल ढगे यांनी केले आहे.
परीक्षेची चिंता क्षमतेमध्ये व्यत्यय आणते
परीक्षेची चिंता ही अस्वस्थता आणि तणावाची एक सामान्य भावना आहे जी परीक्षा देण्यापूर्वी, किंवा दरम्यान विद्यार्थी अनुभवतात. सर्वोत्तम क्षमतेनुसार तयारी करण्यास आणि कामगिरी करण्यास प्रवृत्त करण्यासाठी मध्यम प्रमाणात चिंता उपयुक्त ठरू शकते, परंतु परीक्षेची जास्त चिंता एखाद्या व्यक्तीच्या माहिती शिकण्याच्या आणि आठवण्याच्या क्षमतेमध्ये व्यत्यय आणू शकते, ज्यामुळे परीक्षेतील गुण कमी होतात आणि शैक्षणिक कामगिरी कमी होते.
– डॉ अतुल ढगे