(खेड/इक्बाल जमादार)
मागील काही दिवस कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे परशुराम घाटात दरडी कोसळण्याचे प्रमाण वाढले आहे. या दरडींमुळे वाहतूक बंद ठेवण्याची वेळ प्रशासनावर आली होती. चौपदरीकरणामुळे या दरडी कोसळण्याचे प्रमाण वाढले आहे. चौपदरीकरणाच्या रखडलेल्या कामाबाबत ऍड. ओवेस पेचकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर 7 जुलैला सुनावणी झाली.
सुनावणी वेळी न्यायालयाने परशुराम घाटाच्या रखडलेल्या कामाबाबत नाराजी व्यक्त केली. दरडी कोसण्याचा धोका असलेल्या ठिकाणी सीसीटिव्ही कॅमेरे बसवून घाटावर नजर ठेवण्याच्या सूचना न्यायाधीश मेनन आणि कर्णिक यांनी दिल्या. त्याचबरोबर रात्रीच्या वेळी दरडी कोसळण्याचा धोका असलेल्या ठिकाणी हॅलोजन लाईटसह अन्य उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या आहेत.
मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाटात सहा दरडप्रवण क्षेत्रात दोन कंत्राटदार कंपन्यांच्या माध्यमातून आवश्यक त्या उपाययोजना केल्या आहेत. यातूनच गुरूवारपासून सीसीटीव्ही कॅमेरे घाटात बसवण्यात आले आहेत.
कल्याण टोलवेज कंपनीकडून घाटातील वरच्या बाजूस चार ठिकाणच्या दरडप्रवण क्षेत्रात कॅमेरे बसवण्यात आले आहे. आणि याच ठिकाणी शेडमध्ये त्याचे नियंत्रण युनिट बसवण्यात आले आहे. तेथे 24 तास कर्मचारी लक्ष ठेवून आहे, तर ईगल इन्फ्राकडून 2 ठिकाणी कॅमेरे बसवण्यात आले आहेत.