(मुंबई)
‘कार्डिलिया क्रुज ” छाप्यामध्ये सापडलेल्या आर्यन खानच्या सुटकेसाठी २५ कोटी रुपयांची मागणी केल्याचा आरोप असलेले एनसीबी मुंबई विभागाचे माजी संचालक समीर वानखेडे यांचे परदेश दौरे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. मात्र या परदेश दौऱ्याचा खर्च कुटुंबाने दिलेल्या पैशातून केल्याचा दावा वानखेडे यांनी उच्च न्यायालयात केला आहे. समीर वानखेडे यांनी यासंदर्भात एक प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर केले आहे.
समीर वानखेडे यांनी आपल्यावर चुकीचे आरोप करून खोट्या गुन्ह्यात अडकवले जात असल्याचा उल्लेख मुंबई उच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात केला आहे. तसेच त्यात त्यांनी आपल्या कुटुंबाचे सरासरी उत्पन्न किती आहे याची माहितीही दिली आहे. आपले स्वतःचे आणि पत्नी क्रांती रेडकर तसेच वडिलांचे उत्पन्न त्यात दाखवले आहे. यामध्ये २०१७-१८ ते २०२१-२२ दरम्यान वानखेडे यांचे एकूण उत्पन्न २२.१६ लाख, पत्नीचे ५.९० लाख आणि वडीलांचे उत्पन्न ४.९९ लाख रुपये इतके असल्याचे या प्राप्तिकर विवरणपत्रातून दिसून येत आहे. तसेच वानखेडे याचे स्वतःचे उत्पन्न २०१७-१८ मध्ये १८.४९ लाख, २०१९-२० मध्ये २१.७० लाख, २०२०-२०२१ मध्ये २३.३६ लाख आणि २०२१-२२ मध्ये २४.९४ लाख रुपये इतके आहे. मात्र आपले परदेश दौरे व परदेश दौऱ्यात झालेला खर्च कुटुंबाने दिलेल्या पैशातून केल्याचा दावा वानखेडे यांनी उच्च न्यायालयात केला आहे.
सीबीआयने मात्र वानखेडे यांच्याविरोधात आपल्याकडे भ्रष्टाचार आणि खंडणीचे प्रथमदर्शनी पुरावे असल्याचा दावा केला आहे. सध्या वानखेडे यांना न्यायालयाने अटकेपासून हंगामी संरक्षण दिले आहे