(नवी दिल्ली)
चीनसह अनेक देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. बीएफ ७ व्हेरियंटमुळे जगभरात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून खबरदारी घेतली जात आहे. २ दिवसांपासून विमानतळावर प्रवाशांची रॅन्डम कोरोना चाचणी केली जात आहे. मागील २ दिवसांत परदेशातून आलेल्या ३९ प्रवाशांना कोरोनाची लागण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून विमान प्रवासासाठी नवीन नियमावली जारी करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार २६ आणि २७ तारखेला विमानतळावर ६ हजार प्रवाशांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. त्यामध्ये ३९ प्रवासी कोरोनाबाधित असल्याचे समोर आले आहे. सर्व प्रवाशांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. त्यांचे नमुने तपासासाठी लॅबमध्ये पाठण्यात आले आहेत. दोन वर्षांपूर्वी कोरोनाची एन्ट्री झाल्यानंतर केंद्र सरकारकडून विदेशी प्रवाशांसाठी नियमावली तयार केली होती. यामध्ये एअर सुविधा पोर्टलचा समावेश होता. या पोर्टलमध्ये प्रवाशांना एक फॉर्म भरावा लागतो. त्यामध्ये प्रवासाबाबत माहिती द्यावी लागते. हा फॉर्म भरल्यानंतर प्रवाशांना बोर्डिंग पास देण्यात येतो.
केंद्र सरकारने जारी केलेल्या गाईडलाईन्समध्ये ६ देशांतून येणा-या प्रवाशांचा समावेश आहे. यामध्ये चीन, जपान, दक्षिण कोरिया, हाँगकाँग, थायलंड आणि सिंगापूर या देशातून येणा-या फ्लाईट्सचा समावेश आहे. या देशातून येणा-या प्रवाशांना एयर सुविधा गाइडलाइन लागू करण्यात येणार आहे. या देशातून येणा-या सर्व प्रवाशांना आरटी-पीसीआर चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे. विमानतळावरील सुविधांची चाचपणी करण्यासाठी आरोग्यमंत्री मनसुख मांडविया आज विमानतळावर भेट देणार आहेत.
जगभरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने परदेशातून येणा-या प्रवाशांमध्ये कोरोनाची रुग्णांची संख्याही वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर भारतासाठी जानेवारी महिना महत्वाचा ठरणार आहे. देशातील सर्व नागरिकांना कोरोना नियमांचे कठोर पालन करण्याची सूचना केंद्राकडून करण्यात आली आहे.