रत्नागिरी : रिफायनरी पेट्रोकेमिकल्स लिमिटेड (आरआरपीसीएल) कंपनीच्या बारसू प्रकल्पाविरोधात बातम्या लिहिल्याने हत्या झालेले रत्नागिरीचे पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या हत्याकांडातील मुख्य आरोपी पंढरीनाथ आंबेरकर व त्याच्या नातेवाईकांनी प्रकल्पाच्या भागात तब्बल २.८ कोटी रुपयांच्या १० हेक्टर्स जमिनीचे व्यवहार केल्याची माहिती समोर आली आहे. एवढेच नाही तर आंबेरकर याला आरआरपीसीएलने डिसेंबर २०२२ मध्ये लॉजिस्टिक सेवाच्या बदल्यात ४ लाख ४४ हजारांची रक्कमही अदा केल्याचेही उघड झाले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील रिफायनरी प्रकल्पाने पर्यावरणाचे उल्लंघन केल्याचा आरोप ४८ वर्षीय श वारिशे सातत्याने करीत. यातूनच पुढे ६ फेब्रुवारी २०२३ ला त्यांची हत्या झाली होती. याला नुकतेच एक वर्ष पूर्ण झाले.
या हत्येतील मुख्य आरोपी पंढरीनाथ आंबेरकर हा खून व पुरावे नष्ट करण्याच्या आरोपांसह तुरुंगात आहे. वारिशे यांच्या स्कूटरला एसयूव्हीने धडक देत त्यांना चिरडल्याचा आरोप आंबेरकरवर आहे. आंबेरकर याने हत्येआधी वारिशे यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचे रत्नागिरी पोलिसांनी न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात म्हटले आहे. तर तो व त्याचे कुटुंबिय प्रकल्पाशी संबंधित गावांतील अनेक जमिनीच्या व्यवहारात गुंतले होते.
आरआरपीसीएल कंपनी बारसूमध्ये रिफायनरी प्रकल्प राबविणार आहे. प्रारंभी नाणार (जि. रत्नागिरी) येथे होणारा हा प्रकल्प स्थानिकांच्या विरोधानंतर बारसू (ता. राजापूर) येथे स्थलांतरित झाला. त्यावेळी प्रकल्पासाठी १३ हजार एकर जमीन संपादित करण्याची खात्री राज्य सरकारने दिली होती. परंतु २०२३ च्या सुरुवातीला सरकारने बारसूमध्ये सर्वेक्षण व माती परीक्षण सुरू केल्यावर स्थानिकांकडून विरोध सुरू झाला. शेवटी प्रकल्पाचे काम रखडले.
आंबेरकरची जमिनीत मोठी गुंतवणूक
पंढरीनाथ आंबेरकर, त्याची बहिण प्रतीक्षा खडपे व पुतण्या अक्षय यांनी या प्रकल्पाशी संबंधित गावांमध्ये १०.२ हेक्टरहून अधिक व सुमारे २.८ कोटी रुपये किमतीच्या ३० हून अधिक जमिनींचे व्यवहार केल्याचे गेल्या तीन वर्षांच्या भूमी अभिलेखाच्या नोंदीतून समोर आले आहे. या नोंदींनुसार आंबेरकरने स्वतः सहा शेतजमिनींची खरेदी केली. एक विकली तर इतर आठ जमिनींची पॉवर ऑफ अँटर्जी त्याच्याकडे होती. हे सर्व व्यवहार ८०,६४ लाख रुपये किमतीचे होते. त्याने सप्टेंबर २०२१ ते जून २०२२ दरम्यान खरेदी केलेल्या या सहापैकी चार बारसू गावात (१.०७ हेक्टर) व दोन धोपेश्वरमध्ये (०.६७४ हेक्टर) आहेत. या जमिनींच्या खरेदीसाठी त्याने ४७.२९ लाख रुपये दिले तर एका जमिनीची विक्री केली. प्रतीक्षा खडपेने ३ मार्च २०२२ रोजी ५० हजार रुपयांना ०.११ हेक्टर जमीन खरेदी केली. खडपे राजापूर नगरपरिषदेत तत्कालिन एकसंघ शिवसेनेच्या सदस्या होत्या आणि २०२१ मध्ये एका ठरावावर तिने रिफायनरीच्या बाजूने मतदान केले होते.
तिने हा भूखंड आपल्या अल्पवयीन मुलगा व वैष्णवी आंबेरकर या दोघांच्या नावे खरेदी केला होता. तर अक्षयने ऑक्टोबर २०२१ ते एप्रिल २०२३ दरम्यान दोन कोटींवर किमतीच्या १९ जमिनींचे (८.४१ हेक्टर) व्यवहार केले. या व्यवहारात जमीन विक्रेता किंवा खरेदीदार यांचे मुखत्यारपत्र (पॉवर ऑफ अँटर्नी) अक्षयकडे होते. यापैकी पाच सौद्यांत त्याच्याकडे मुंबई महापालिकेचे निवृत्त उपायुक्त किरण आचरेकर यांचेही मुखत्यारपत्र होते. आचरेकर यांनी नाटे, पन्हाळे राजापूर व सोलगाव या गावांत ५.१९५ हेक्टर जमीन १.७२ कोटी रुपयांना खरेदी केली होती.
अपघाताचा बनाव, जामिन नाही
आंबेरकर सध्या रत्नागिरी मध्यवर्ती कारागृहात आहे. वारिशेचा मृत्यू अपघाती असल्याचा दावा त्याने केला आहे. ऑटोमॅटिक कार चालवताना अॅक्सिलेटर व ब्रेकमध्ये पाय अडकून वाहनावरील नियंत्रण सुटले आणि वारिशेच्या स्कूटरला धडक बसली, असे त्याचे म्हणण आहे.