(रत्नागिरी)
ग्रामीण भागाचा विकास रखडला आहे, नागरिकांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडण्याची ताकद पत्रकारितेत आहे. विकास पत्रकारिता करताना प्रश्नांचा पाठपुरावा, सातत्य, चिकाटी आणि निडरपणा आवश्यक आहे. ग्रामीण भागातील समस्यांवर पत्रकारांची एकजूट ग्रामीण भागातील प्रश्न सोडवण्यासाठी दिशादर्शक ठरेल असे स्पष्ट मत जेष्ठ पत्रकार विजयकुमार बांदल यांनी रत्नागिरी येथे आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले.
ग्रामीण वार्ता या संकेतस्थळाच्या तृतीय वर्धापन दिनी आयोजित ग्रामीण भागाचा रखडलेला विकास आणि पत्रकारांची जबाबदारी या परिसंवादात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. यावेळी बांदल यांनी पत्रकारितेचे बदलते स्वरूप,काही टीव्ही मीडिया मध्ये घसरत चाललेला पत्रकारितेचा दर्जा यावर थेट भाष्य करत काहीजनांची आजची पत्रकारिता ही आरडाओरडा करण्याची झाली आहे. याबाबत खंत व्यक्त केली. ग्रामीण भागातील प्रश्न सोडवण्यासाठी ग्रामीण पत्रकारांची समस्या बाबत पाठपुरावा करण्यासाठी एकजूट असेल तर हा प्रयोग दिशादर्शक ठरेल असे ते म्हणाले.
ग्रामीण वार्ता या डिजिटल मिडीयाला येत्या ११ जून ला ३ वर्षे पूर्ण होत आहेत. याचेच औचित्य साधुन वर्धापनदिन सोहळा आयोजित करण्यात आला होता.
प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेल्या पत्रकार जान्हवी पाटील म्हणाल्या की, आता पत्रकारिता ही बदलली आहे. अगदी खेड्यात पाड्यात राहणारे लोक सुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून पत्रकारिता करायला लागले आहेत. कोणते प्रश्न असतील तर लगेच सोशल मीडियाच्या माध्यमातून आमदार, खासदार ते मोठ मोठ्या नेत्यांना लगेच टॅग, ट्विट करून त्यांच्या पर्यंत पोचवतात. पत्रकारिता ही फारशी किचकट राहिलेली नाही. ग्रामीण भागाचा विकास करताना जे पत्रकारांच्या डोळ्यांना दिसतंय ते मांडणे आवश्यक आहे.
वृत्तनिवेदक मुख्तार राजापकर म्हणाले की, पूर्वी सारखी शोध पत्रकारिता आता दिसत नाही. ग्रामीण भागातील प्रश्न आपल्या लेखणीच्या माध्यमातून मांडणे गरजेचे आहे. प्रामाणिक पत्रकारिता आजच्या घडीला महत्त्वाची आहे.पत्रकारिता करत असताना दबावतंत्र झुगारले पाहिजे.
त्याचबरोबर प्रमोद कोनकर म्हणाले की, बदलत्या युगात पत्रकारिता ही सोपी झालेली आहे. पूर्वी सारख्या फार अडचणी येत नाहीत. आता जग मोबाईलच्या माध्यमातून हातात आले आहे. एखादी घटना घडली तर ती लगेच काही क्षणात सगळीकडे पोचते. पत्रकारितेला आवाज हा मुक्त असला पाहिजे.
या कार्यक्रमामध्ये ग्रामीण वार्ता या डिजिटल मीडियाच्या ‘ग्रामीण भागाचा रखडलेला विकास’ या विशेषांकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. आणि ग्रामीण वार्ता डिजिटल मीडिया नव्याने सुरू केलेल्या ‘डिजिटल ग्रामीण रेडिओ’ च्या पोस्टरचे सुद्धा या वेळी प्रकाशन करण्यात आले.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी आणि वक्ते म्हणून ज्येष्ठ पत्रकार आणि उपाध्यक्ष, मुंबई मराठी पत्रकार संघ, मुंबईचे
श्री.विजयकुमार बांदल, गाव विकास समितीचे अध्यक्ष उदय गोताड, संघटन प्रमुख व पत्रकार सुहास खंडागळे, पत्रकार जान्हवी पाटील, पत्रकार मुख्तार राजापकर, प्रमोद कोनकर,आनंद तापेकर, सामाजिक कार्यकर्ते राजू भाटलेकर, संपादक मुझम्मील काझी, रहीम दलाल, समीर शिगवण, तन्मय दाते, जमीर खलफे, कपिलानंद कांबळे, डॉ.मंगेश कांगणे, दैवत पवार, नितीन गोताड हे उपस्थित होते.