(मुंबई)
मुंबईतील एका न्यायालयाने कौटुंबिक हिंसाचार प्रकरणात पतीला पत्नी आणि तिच्या तीन पाळीव कुत्र्यांना पोटगी देण्याचा आदेश दिला आहे. ५५ वर्षीय महिलेने पतीविरोधात कौटुंबिक हिंसाचार कायद्यांतर्गत खटला दाखल केला होता. यात पतीने तिच्यासह ३ रॉटविलर जातीच्या श्वानांच्या देखभालीसाठी दर महिन्याला ७० हजार रुपये खर्चही द्यावा अशी, मागणी केली होती. त्यानुसार न्यायालयाने महिलेला दरमहा ५० हजार निर्वाह भत्ता देण्याचा आदेश दिला आहे.
न्यायालयाने निर्णय देताना विशेष टिप्पणी करत म्हटले की, पाळीव प्राणीदेखील सुसंस्कृत जीवनशैलीचा अविभाज्य भाग आहेत आणि माणसाला निरोगी जीवन जगण्यासाठी ते आवश्यक आहेत. तुटलेल्या नात्यांमुळे निर्माण होणारी भावनिक पोकळी पाळीव प्राणी भरून काढतात. तर न्यायालयात आपली बाजू मांडताना पतीने सांगितले की, माझा यात काही दोष नाही. पत्नीने स्वेच्छेने घर सोडले होते. माझे व्यवसायात नुकसान झाल्यामुळे मी पत्नीला पोटगी देऊ शकत नाही. मात्र त्याच्याकडे व्यवसायात नुकसान झाल्याचे कोणताही ठोस पुरावे आढळले नाहीत कोण किंवा ते कोर्टाला सादर केले गेले नाहीत. त्यामुळे महिलेला दरमहा ५० हजार निर्वाह भत्ता देण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.