(मुंबई)
मुंबईत धक्का लागून हाणामारीचे व वादावादीचे प्रकार तर सर्रास पाहायला मिळतात. मात्र याच किरकोळ कारणावरून एका तरुणाचा जीव गेल्याची घटना मुंबईत घडली आहे. मुंबईतील सायन रेल्वे स्थानकावर ही घटना घडली आहे. सायन रेल्वे स्थानकाच्या फलाटावर एका महिलेला तरुणांचा धक्का लागल्याने महिलेचा पारा चांगलाच चढला. त्यानंतर महिला व तिच्या पतीने मिळून तरुणाची चांगलीच धुलाई केली. या धक्काबुक्कीत तरुण फलाटावरून रेल्वे रुळावर पडला आणि त्याचवेळी आलेल्या लोकल ट्रेनने त्याला जोरदार धडक दिली. लोकलच्या धडकेत तरुणाचा जागीच मृत्यू झाला.
दिनेश राठोड (वय २६) असे मृत तरुणाचे नाव आहे तर शीतल माने व अविनाश माने अशी आरोपींची नावे आहेत. रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सायन रेल्वे स्थानकावर दिनेशचा शीतल माने नावाच्या महिला प्रवाशाला धक्का लागला. यानंतर चिडलेल्या शीतलने दिनेशला हातातील छत्रीने मारहाण करायला सुरूवात केली. पत्नी व तरुणामध्ये होत असलेली बाचाबाची पाहून थोड्या अंतरावर उभा असलेला महिलेचा पती अविनाश माने देखील तेथे आला व पत्नीसोबत त्यानेही दिनेशला मारहाण करायला सुरुवात केली. दोघांच्या मारहाणीत व धक्काबुक्कीत दिनेश थेट रेल्वे रुळावर पडला. रुळावर पडल्यानंतर दिनेश उठत असतानाच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या लोकलने त्याला उडवलं. गंभीर जखमी अवस्थेत दिनेशला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर अविनाश माने आणि त्याची पत्नी शीतल माने यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. धक्का लागल्याच्या किरकोळ कारणावरून एका तरुणाचा हकनाक बळी गेला आहे. रुग्णालयात मृताच्या नातेवाईकांनी गर्दी केली होती. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.