(सांगली)
पती पत्नीचा वाद विकोपाला जाऊन एकमेकांवर झालेल्या हल्ल्यात पती ठार झाला आहे. ही घटना सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील एरंडोली येथे घडली आहे. पतीची हत्या केल्यानंतर पत्नीने घटनास्थळावरुन पोबारा केला. सध्या ती फरार असून पोलीस तिच्या मागावर आहेत. धक्कादायक म्हणजे एकाच दिवसामध्ये हत्येच्या सलग दोन घटना घडल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. पती पत्नीमध्ये वादालाही विशेष कारण नसल्याचे पुढे आले आहे. पती-पत्नीतील किरकोळ भांडणाचे रुपात पुढे मोठ्या वादात झाले. त्यातूनच हा हल्ला झाला. एकाच वेळी धारधार शस्त्राने अधिक वार केल्याने आणि हे वार वर्मी लागल्याने मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे.
सुभेदार काळे असे पतीचे तर चांदणी काळे असे पत्नीचे नाव आहे. दोघेही पारधी वस्तीवर राहतात. दुपारच्या जेवणासाठी स्वयंपाक करत असताना सुभेदार आणि चांदणी यांच्यात किरकोळ कारणावरुन वाद झाला. त्यात सुभेदार काळे याने चांदणीला शिवागाळ केली. चांदणी आणि सुभेदार यांच्यात होणारी भांडणे नित्याचीच असल्याचे वस्तीवरील शेजाऱ्यांनी संगितले. चांदणीही सुभेदारच्या सततच्या भांडणे, शिवीगाळ आणि मारहाणीला तशीच प्रत्युत्तर देत होती.
दरम्यान, ही घटना घडली त्या दिवशीही सुभेदार चांदणीला मारण्यासाठी तिच्या अंगावर धावून गेला. दरम्यान, चांदणी हिणे स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या धारधार वस्तूने पती सुभेदार याच्यावर जोरदार वार केले. सपासप झालेल्या वारांतील काही वार सुभेदारच्या वर्मी लागले. त्यातच त्याचे प्राण गेले. सुभेदार याचे वय 45 वर्षे आहे.
सुभेदार काळे याची पत्नीकडूनच हत्या झाल्याचे समजताच अवघ्या पारधी वस्तीवर खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिरज ग्रामीण पोलिसांनाही समजली. त्यानंतर मिरज ग्रामीणचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी सुभेदार काळे याचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. दरम्यान, चांदणी काळे पसार झाली असून पोलीस तिचा शोध घेत आहेत.