(गुहागर)
पत्नीच्या माहेरी जाऊन सासरे व पत्नीला मारहाण केल्याची घटना बुधवारी सायंकाळी बुधल (ता. गुहागर) येथे घडली. याप्रकरणी गुहागर पोलिस स्थानकात भूषण विठोबा दाभोळकर (३१, रा. कुडली, ता. गुहागर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,भूषण विठोबा दाभोळकर हा खलाशी म्हणून काम करताे. लग्न झाल्यापासून पत्नी कोमल दाभोळकर व भूषणचे एकमेकांशी पटत नव्हते. त्यामुळे कोमल ही वडील दिलीप गणपत असगोलकर (रा. बुधल) यांच्याकडेच गेले काही महिने राहत होती. भूषण सहा महिन्यांनंतर घरी परतल्यानंतर त्याने पत्नी कोमल हिला घरी येण्यासाठी संपर्क केला होता.
या प्रकरणी समेट होण्यासाठी दोन्ही गावांतील जेष्ठ लोक बसून मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, कोमल हिने सासरी जाण्यास ठामपणे नकार दिला. याचा राग घेऊन भूषण प्रत्यक्ष पत्नीला आणण्यासाठी बुधवारी सायंकाळी बुधल गावी गेला हाेता. यावेळी पत्नी न आल्याने तिला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
मुलीला सोडवण्याचा प्रयत्न करत असताना तिचे वडील दिलीप गणपत असगोलकर यांच्या डोक्यात त्याने दगड घातला. याबाबत दिलीप असगोलकर यांनी फिर्याद दिली आहे. तसेच शिवीगाळ, मारहाण व दुखापत केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल गणेश कादवडकर करत आहेत.