(लाईफ स्टाईल)
प्राचीन लोककथेनुसार, एका व्यक्तीच्या लग्नाला दोन वर्ष पूर्ण झाले होते. व्यक्ती खूप कष्टाळू होती. परंतु गरिबी त्याची पाठ सोडत नव्हती. गरिबी दूर करण्यासाठी त्याने परदेशात जाऊन पैसे कमावण्याचा विचार केला. हा विचार त्याने पत्नी आणि वडिलांना सांगितलं. त्याची पत्नी गरोदर होती यामुळे दोघेही त्याच्या विचाराशी सहमत नव्हते परंतु गरिबीमुळे हवालदिल झाल्याने ही व्यक्ती परदेशात जाण्यासाठी हट्टाला पेटली होती. रात्री पत्नी आणि वडील झोपलेले असताना तो घरातून बाहेर पडून परस्पर परदेशात निघून घेला.
परदेशात जाऊन त्याने खूप कष्ट केले आणि 20 वर्षांमध्ये तो श्रीमंत व धनवान झाला. खूप पैसे कमावल्यानंतर त्याने घरी जाण्याचा विचार केला. जहाजात बसून तो आपल्या देशाकडे निघाला. जहाजात त्याला एक व्यक्ती भेटली. ती व्यक्ती ज्ञानाचे सूत्र विकत होती. तो धनी व्यक्तीला म्हणाला मी येथे ज्ञानाचे सूत्र विकण्यासाठी आलो होतो, परंतु कोणीही विकत घेतले नाही आणि यामुळे रिकाम्या हाताने घरी जात आहे.
धनी व्यक्तीने त्याचे एक ज्ञान सूत्र खरेदी करण्याचा विचार केला. ज्ञान सूत्र विकणारा व्यक्ती म्हणाला एक सूत्राची कीमत 500 सुवर्ण मुद्रा आहे. श्रीमंत व्यक्तीने त्याला 500 सुवर्ण मुद्रा दिल्या. त्या व्यक्तीने एका कागदावर लिहिले – कोणतेही काम करण्यापूर्वी दोन मिनिट थांबून विचार करावा. श्रीमंत व्यक्तीने तो कागद खिशात ठेवला.
काही दिवसानंतर श्रीमंत व्यक्ती आपल्या शहरात पोहोचला. पती आणि वडिलांना खुश करण्यासाठी तो गुपचुपत घरामध्ये घुसला. पत्नीच्या खोलीमध्ये गेल्यानंतर त्याला पत्नीजवळ एक मुलगा झोपलेला दिसला. ते पाहून त्याला खूप राग आला. त्याने विचार केला की, विदेशात मी हिच्यासाठी पैसे कमवत होतो आणि आपल्या पत्नीने तर दुसरे लग्न केले. त्या रागात त्याने खोलीत ठेवलेला चाकू उचलला आणि पत्नीला मारण्यासाठी पुढे सरकला. तेवढ्यात त्याला ज्ञान सूत्र लक्षात आले की – कोणतेही काम करण्यापूर्वी दोन मिनिट शांत विचार करावा.
तो थांबून विचार करत होता तेवढ्यात एक भांडे जमिनीवर पडले आणि त्या आवाजामुळे पत्नी झोपेतून जागी झाली. खोलीमध्ये उजेड केल्यानंतर समोर तिला पती दिसला. पतीला पाहताच तिने जवळ झोपलेल्या मुलाला उठवले आणि म्हणाली ‘बाळा उठ, तुझे वडील आले आहेत.’ हे ऐकताच व्यक्तीची मान शरमेने खाली गेली. त्याने विचार केला की, दोन मिनिट थांबलो नसतो तर सर्वकाही उद्धवस्त झाले. ज्ञान सूत्रामुळे अनर्थ टळला.
मुलगा त्याच्या पाया पडण्यासाठी उठल्यानंतर त्याचे केस मोकळे झाले. पत्नीने पतीला सांगितले की, तुम्ही गेल्यानंतर मी एका मुलीला जन्म दिला. काही दिवसानंतर तुमच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर तर मुलीला लोकांना वाईट नजरांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी मी तिला मुलाप्रमाणे वाढवले. त्या व्यक्तीने रडत-रडत पत्नी आणि मुलीला मिठी मारली. त्याला ते ज्ञान सूत्र महाग वाटले होते परंतु या प्रसंगानंतर त्याला ते अनमोल सूत्र असल्याचे लक्षात आहे.
कथेची शिकवण
या कथेची शिकवण हीच आहे की, ज्ञान तर अनमोल आहे. कोणताही काम करण्यापूर्वी दोन मिनिट थांबून शांत विचार करावा. घाईगडबडीत कोणतेही काम करू नये. विशेषतः वैवाहिक जीवनात राग आल्यानंतर पती-पत्नीने हे सूत्र अवश्य लक्षात ठेवावे अन्यथा सर्वकाही नष्ट होऊ शकते.
@ यशवंत नाईक