(चिपळूण /ओंकार रेळेकर)
तळागाळातील घटकांना त्यांच्या छोट्या मोठ्या व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध व्हावे, त्यांचा संसार चालवताना आर्थिक हातभार लावण्यासाठी सहकारी पतसंस्था ही कार्यप्रणाली अतिशय महत्त्वाचे आहे. बदलत्या काळानुसार कोकणामध्ये सहकार क्षेत्र वाढत आहे. अनेक पतसंस्थांची निर्मिती होत आहे. मात्र नुसत्या पतसंस्था काढून उपयोग नाही. तर कर्ज वसुली ही अतिशय महत्त्वाची बाब असल्याने कर्ज देताना त्याची उत्पादकता बघा. भावनिक होऊन कर्ज देऊ नका असा सल्ला सुप्रसिद्ध उद्योजक वसंत उदेग यांनी पतसंस्था उद्घाटन कार्यक्रमात दिला.
चिपळूण खेर्डी येथे सह्याद्री मागासवर्गीय नागरी सहकारी मर्यादित पतसंस्था खेर्डी चिपळूण या पतसंस्थेचे उद्घाटन रविवार रोजी सकाळी ११ वाजता सहाय्यक निबंधक येथील प्रथम श्रेणी अधिकारी सौ प्रियंका माने आणि उद्योजक वसंत उदेग यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात श्री उदेग बोलत होते.
उद्घाटन झाल्यानंतर उपस्थित सर्व मान्यवर मंडळींचे पतसंस्थेचे चेअरमन राजेंद्र म्हालिम, व्हा. चेअरमन प्रशांत फागे व संचालक यांच्या वतीने सर्वांचे स्वागत करण्यात आले.मार्गदर्शन करताना श्री उदेग म्हणाले की, सह्याद्री मागासवर्गीय पतसंस्थेच्या उद्घाटनाला जसा सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे. तोच आनंद आणि हीच ताकद शेवटपर्यंत राहिली पाहिजे. फक्त ठेवी जमा करून पतसंस्था चालणार नाही, तर कर्ज वितरणाचे योग्य नियोजन सुद्धा केले पाहिजे. मात्र कर्ज देताना तो माझ्या ओळखीचा आहे, तो माझा नातेवाईक आहे हे बघून किंवा भावनिक होऊन कर्ज न देता कर्ज घेणाऱ्याची उत्पादकता किंवा पत बघून कर्ज दिले पाहिजे. पत म्हणजेच त्याच्याकडे बंगला आहे महाग गाडी आहे, अशी व्यक्ती नसून जो ८ हजार किंवा १० हजार वेतन घेणारा माणूस सुद्धा कर्ज घेऊन नेहमीत त्याचे हफ्ते फेडतो. तो माझ्या मताने पतवान व्यक्ती आहे, असे मी मानतो. कारण कर्जाचे परतफेडचे हप्ते नियमित भरणे म्हणजेच तो प्रामाणिक आहे, त्याला जाणीव आहे आणि पतसंस्थेने कर्ज दिले आहे त्याबद्दल सहानुभूती सुद्धा आहे असाच व्यक्ती पतवान असतो असे त्यांनी बोलताना सांगितले.
कर्ज कशासाठी काढायचे तर आपण आपल्या मुलांचा किंवा स्वतःचा वाढदिवस करण्यासाठी कर्ज घेत असाल परदेशात जाण्यासाठी कर्ज घेत असाल तर ते चुकीचे आहे. असे कधीच करू नका. छोटा मोठा व्यवसाय करण्यासाठी कर्ज घ्या. कर्ज घेण्याचे नियोजन केले तर निश्चितच कर्ज घेणाऱ्या वरती हफ्ते बुडवण्याची वेळ येणार नाही. उत्पादक वाढवण्यासाठी कर्जाचा उपयोग केला तर निश्चितच कर्ज घेणारा सुद्धा पुढे जाईल आणि पतसंस्थेची प्रगती होईल. कर्जदार आणि पतसंस्था यांच्यातील जे नातं आहे ते वाढीस लागेल असे त्यांनी सांगितले.
कर्ज वसुली करताना प्रसंगी कठोर व्हावे लागले तरी चालेल. मात्र एखाद्याचे तीन हप्ते थकले तर निश्चितच धोक्याची घंटा असेल .त्याच्यामुळे कर्ज वसूल करताना नियमाचे पालन करून आणि प्रसंगी थोडसं कठोर होत कर्ज वसूल करण्याची गरज असेल. या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व महिला वर्गांनी बचत करण्यासाठी सह्याद्री मागासवर्गीय पतसंस्थेत आपली बचत करावी. आपण सुद्धा या पत संस्थेत एक लाख रुपये ठेव म्हणून ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले. या पतसंस्थेला शुभेच्छा देत सर्व संचालक मंडळाचे सुद्धा त्यांनी शेवटी अभिनंदन केले.
यावेळी सहाय्यक निबंधक प्रथम श्रेणी वर्ग अधिकारी प्रियंका माने यांनी उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन केले. अतिशय अथक प्रयत्न घेऊन सह्याद्री मागासवर्गीय पत संस्थेची नोंदणी झाली आहे. सर्व संचालक मंडळ प्रवर्तक यांनी खूप मेहनत घेतली आहे असे त्यांनी बोलताना सांगितले. यामध्ये सह्याद्री मागासवर्गीय पत संस्था निश्चितच चांगले प्रगती करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मधुकर मोहिते यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले.
पत्रकार भाई कुळे यांनी सुद्धा मनोगत व्यक्त करून सर्व चेअरमन, व्हा. चेअरमन आणि संचालक मंडळास शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमाला उद्योजक वसंत उदेग, सहायक निबंध प्रथम श्रेणी अधिकारी प्रियंका माने, लेखापाल मधुकर मोहिते, अनंत कराडकर, रवी साळवी, विजय तांदळे, लक्ष्मण साळवी, सौ ऋचा म्हालीम, पत्रकार भाई कुळे व अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पतसंस्थेचे चेअरमन, व्हा. चेअरमन, संचालक, प्रवर्तक व हितचिंतक यांनी प्रयत्न केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप तांदळे यांनी केले.