(रत्नागिरी)
जनसंघ ते भाजप असा राजकीय वारसा रत्नागिरीतील जनसामान्यांच्या मनात रुजवण्यासाठी अथक परिश्रम घेणार्या कार्यकर्त्यांंपैकी एक म्हणजे दिवंगत यशवंतराव माने. राजकारणासोबतच समाजिक कार्यात वाहून घेतलेल्या यशवंतराव माने यांना उदंड लोकप्रतिसाद मिळाला. रत्नागिरी पंचायत समिती सभापती म्हणून त्यांनी उल्लेखनीय योगदान दिले. शेतकरी व मच्छिमार नेता म्हणून आजही त्यांची ओळख कायम आहे.
स्वर्गीय यशवंतराव माने यांचा स्मृतीदिन त्यांचे सुपुत्र माजी आमदार बाळासाहेब माने व श्री. हेमंतराव माने यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी बोलताना बाळासाहेब माने अत्यंत भावुक झाले. त्यांनी आपल्या वडिलांच्या अनेक आठवणींना उजाळा देत आपल्या जडणघडणीचे श्रेय आईवडिलांनी केलेल्या संस्कारांना दिले.
समाजसेवेचे बाळकडू लहानपणापासून मिळाले. वडिलांच्या प्रत्येक गोष्टीचे बारकाईने निरीक्षण करून आकलन करून घेतले. प्रसंगी त्यांच्या कामासंदर्भात माहिती घेतली. लोकांची त्यांच्याविषयी असणारी मते जाणून घेतली. हीच शिदोरी गाठीशी असल्यामुळे रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून प्रतिनिधित्व करण्याची मतदार बंधूभगिनींनी दिली.
स्वर्गीय यशवंतराव माने यांच्या स्मरणार्थ त्यांच्याच नावाने ‘यश फाऊंडेशन’ या संस्थेची स्थापना करून बाळासाहेब माने यांनी वडील आणि समाजाप्रति असणारी कृतज्ञता प्रकट केली आहे. या संस्थेच्या माध्यमातून बाळासाहेब अनेक सामाजिक, सांस्कृतिक उपक्रम राबवतात. सोबतच एक प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे पवित्र कार्य केले जाते. याशिवाय रत्नागिरीमधील विद्यार्थ्यांना नर्सिंग क्षेत्रात रोजगार मिळावा या हेतूने एका नर्सिंग कॉलेजची स्थापनासुद्धा केली आहे.
स्वर्गीय यशवंतराव माने यांचे कार्य, सामाजिक जाणीव आणि राजकीय भान रत्नागिरीकरांच्या कायम स्मरणात रहावे व त्यांचा समाजसेवेचा वारसा अखंडपणे सुरु रहावा हा ‘यश फाऊंडेशन’च्या निर्मितीचा प्रमुख उद्देश आहे. त्यांनी दाखवलेल्या प्रामाणिकपणाच्या रस्त्यावर मी मार्गक्रमण करत असताना आई-वडिलांच्या आशीर्वादाचे भक्कम पाठबळ माझ्यासोबत आहे याचे मनोमन समाधान वाटते. स्वर्गीय यशवंतराव माने, स्वर्गीय शांताराम बापू केतकर, स्वर्गीय जगन्नाथ शंकर केळकर, स्वर्गीय तात्यासाहेब नातू यांनी दिलेल्या विचारांचा वारसा अव्याहतपणे पुढे नेण्यासाठी निष्ठेने भारतीय जनता पार्टीचे काम करणार असल्याचे बाळासाहेब माने यांनी यावेळी स्पष्ट केले.