कोरोनाविरुद्ध लढाईत महाराष्ट्र करीत असलेल्या प्रयत्नांबद्दल, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात दूरध्वनीद्वारे चर्चा करण्यात आली. या संभाषणात राज्यातील कोरोना परिस्थितीवर चर्चा करण्यात आली. मोदी-ठाकरे यांच्यातील फोनवरील चर्चेमुळे राज्यातील 18 वर्षांवरील व्यक्तिंच्या लसीकरणाला गती येणार असल्याचे सांगितले जात आहे.
या चर्चेदरम्यान पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांकडून राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. रेमडेसिवीर इंजेक्शन्स, ऑक्सिजन, लॉकडाऊन, 18 वर्षांवरील व्यक्तिंचं लसीकरण आणि राज्यातील वाढत्या मृत्यूंवर पंतप्रधानांनी माहिती घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील परिस्थिती पंतप्रधानांना अवगत करतानाच राज्यांच्या गरजाही पंतप्रधानांसमोर मांडण्यात आल्या. राज्यात 18 वर्षांवरील व्यक्तिंच्या लसीकरणात येणाऱ्या अडथळ्यांविषयीही मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांकडे माहिती देण्यात आली. सर्वोच्च न्यायालायने ऑक्सिजन पुरवठ्याबाबत मुंबई महापालिकेने केलेल्या प्लानिंगचे कौतुक केले होते. या पार्श्वभूमीवर या दोन्ही नेत्यांची ही चर्चा महत्त्वाची मानली जात होती. दोन्ही नेत्यांनी आज केलेल्या चर्चेचे आगामी काळात सकारात्मक परिणाम दिसून येणार आहे.
पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेशी चांगला मुकाबला करत असल्याचं सांगितले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी देखील विशेषत: महाराष्ट्राला ऑक्सिजनच्या बाबतीत अधिक बळ मिळावे अशी विनंती केली व विविध उपाययोजनांची माहिती दिली. तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी कसे नियोजन करीत आहोत त्याविषयीही मुख्यमंत्री बोलले. पंतप्रधान आणि केंद्र सरकार हे कोरोना लढ्यात महाराष्ट्राला प्रथमपासून मार्गदर्शन करीत असून त्याचा चांगला उपयोग राज्य सरकारला होतो आहे, महाराष्ट्राच्या काही सुचना केंद्राने मान्यही केल्या याविषयीही मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांचे आभार मानले. या दरम्यान, मोदी-ठाकरे यांच्यातील चर्चेमुळे 18 ते 44 वर्षांवरील व्यक्तिंच्या लसीकरणाला वेग येणार असल्याचं सांगितलं जात आहे. रशियाच्या स्पुतनिक-व्ही या लसीला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे ही महाराष्ट्राला मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मोदी आणि ठाकरे यांच्या संभाषणाचा प्रमुख रोख हा लसीकरणावरच होता. त्यामुळे राज्यात येत्या काही दिवसात वेगाने लसीकरण होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
Post Views: 42