(नवी दिल्ली)
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज 17 सप्टेंबर रोजी वाढदिवस आहे. पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त राज्यात सेवा पंधरवडा साजरा करण्यात येत असल्याची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. मात्र, आता पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी जन्माला येणाऱ्या मुलांना सोन्याची अंगठी दिली जाईल, अशी घोषणा तामिळनाडू भाजपने केली आहे. इतकंच नाही तर मोदी 72 वर्षांचे होत आहेत म्हणून यादिवशी 720 किलो मासे देखील वाटले जाणार आहेत.
चेन्नईतील आरएसआरएम या रूग्णालयात मोदींच्या वाढदिवशी जन्माला येणाऱ्या नवजात बालकांना प्रत्येकी 2 ग्रामची सोन्याची अंगठी दिली जाणारे ज्याची किंमत 5 हजारांच्या घरात असू शकते. तर 17 सप्टेंबर रोजी या आरएसआरएम रूग्णालयात 10 ते 15 मुलांचा जन्म होण्याचा अंदाज आहे.
याशिवाय केंद्रीय मत्स्यव्यवसाय राज्यमंत्र्यांनी पीएम मोदींच्या 72 व्या आजच्या वाढदिवसानिमित्त 720 किलो मासे वाटपाच्या कार्यक्रमाचीही माहिती दिली. मंत्री मुरुगन म्हणाले की, मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचा विधानसभा मतदारसंघ असलेल्या कोलाथूरमध्ये पंतप्रधान मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत मासे वाटप करण्यात येणार आहेत. या योजनेचा उद्देश मत्स व्यवसायाला चालना मिळावी तसेच लोकांना माशांचा आरोग्याला होणार फायदे कळावे हा असल्याचे त्यांनी सांगितले.
भारतीय जनता पक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस विशेष स्वरूपात आज साजरा होत आहे. या दिवसापासून 2 ऑक्टोबरपर्यंत म्हणजेच महात्मा गांधी जयंतीपर्यंत भाजपतर्फे ‘सेवा पंधरवडा’ साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त विविध समाजोपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती भाजपातर्फे देण्यात आली आहे.