पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हीराबेन मोदी यांचं वृद्धापकाळ आणि प्रदीर्घ आजाराने निधन झालं. अहमदाबादच्या यूएन मेहता रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 18 जून 2022 रोजी हीराबेन यांनी 100 व्या वर्षात पदार्पण केलं होतं. त्यांच्या मागे पंतप्रधान नरेंद्र मोदी, सोमभाई, अमरुतभाई, प्रल्हादभाई, पंकजभाई ही मुलं आणि मुलगी वासंतीबेन यांच्यासह सुना, नातवंडे, पतरुंड असा मोठा परिवार आहे. हीराबेन यांच्या निधनावर सामाजिक तसेच राजकीय क्षेत्रातून शोक व्यक्त केला जात आहे.
शानदार शताब्दी का ईश्वर चरणों में विराम… मां में मैंने हमेशा उस त्रिमूर्ति की अनुभूति की है, जिसमें एक तपस्वी की यात्रा, निष्काम कर्मयोगी का प्रतीक और मूल्यों के प्रति प्रतिबद्ध जीवन समाहित रहा है। pic.twitter.com/yE5xwRogJi
— Narendra Modi (@narendramodi) December 30, 2022
हिराबेन यांना बुधवारी २८ डिसेंबरला अहमदाबादमधील यूएन मेहता हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. हॉस्पिटलमध्ये दाखल केलं तेव्हा त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली होती. हीराबेन यांच्यावर गेल्या तीन दिवसांपासून रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र वृद्धापकाळ आणि आजारपण यामुळे हीराबेन यांची प्रकृती अधिकच खालावली. उपचाराला साथ न दिल्याने अखेर त्यांची रुग्णालयातच प्राणज्योत मालवली. आईच्या अंत्यसंस्कारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी गांधीनगर येथे येणार असल्याचं वृत्त आहे. मोदी अंत्यसंस्काराला येणार असल्याने गांधी नगरातील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात येत आहे.
हीराबेन यांचा जन्म 18 जून 1923मध्ये झाला होता. या वर्षी त्यांनी वयाची शंभरी गाठली होती. त्यानिमित्ताने त्यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला होता. त्यावेळी नरेंद्र मोदींनी एक ब्लॉग लिहिला होता. “माझ्या जीवनात, माझ्या व्यक्तिमत्त्वात जे काही चांगलं आहे ते माझ्या आई वडिलांमुळेच आहे” अशा शब्दात त्यांनी आईबद्दलच्या भावना व्यक्त केल्या होत्या. हिराबांनी अंगावर कधी सोन्याचे दागिने घातले नाही आणि त्यांच्या नावावर कोणतीही संपत्ती नाही असा उल्लेख पंतप्रधानांनी या ब्लॉगमध्ये केला आहे. आईच्या वाढदिवसासाठी स्वत: नरेंद्र मोदी गुजरातच्या गांधीनगरला आले होते. त्यांनी आईचे पाय धुवून आशीर्वादही घेतले होते.
दरवर्षी आपल्या वाढदिवसाला हिराबांची भेट घेऊन मोदी आशीर्वाद घ्यायचे. वाढदिवसाला हिराबा त्यांना कायम भेट म्हणून काही पैसे द्यायच्या. मोदींच्या ६४ व्या वाढदिवशी हिराबांनी त्यांना ५००० रुपये गिफ्ट म्हणून दिले होते. पंतप्रधान रिलिफ फंडात ते पैसे जमा करण्यात आले होते. गुजरात निवडणुकीवेळी मतदान करायला गेले असताना मोदींनी हिराबेन यांचे आशिर्वाद घेतले होते.