(मोहाली)
लखनौने पंजाबचा दारुण पराभव करत गुणतालिकेत मोठी झेप घेतली आहे. मोहालीत झालेल्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने पंजाब किंग्जचा तब्बल ५६ धावांनी पराभव केला आहे. लखनौने पंजाबला २५८ धावांचं लक्ष्य दिलं होतं, परंतु पंजाब २० षटकांत २०१ धावाच करू शकला. पंजाबकडून अथर्व तायडे याने एकाकी झुंज दिली. अथर्व तायडे याने अर्धशतक झळकावले. त्याचा अपवाद वगळता इतर फलंदाजांनी विकेट फेकल्या. लखनौकडून यश ठाकूर याने चार विकेट घेतल्या तर नवीन उल हक याने तीन फलंदाजांना तंबूत धाडले.
२५८ धावांचा पाठलाग करताना पंजाबची सुरुवात निराशाजनक झाली. कर्णधार शिखर धवन एका धावेवर तंबूत परतला. त्यानंतर प्रभसिमरनही ९ धावा काढून बाद झाला. एका बाजूला विकेट पडत असताना दुस-या बाजूला तायडे धावा कूटत होता. अथर्व तायडे आणि सिकंदर रजा यांनी पंजाबच्या विजयाच्या आशा वाढवल्या होत्या. पण अथर्व आणि सिकंदर रजा एकापाठोपाठ बाद झाले. अथर्व तायडे याने ६६ धावांचे योगदान दिले. तर सिकंदर रजा याने ३६ धावा केल्या. यामध्ये एक षटकार आणि चार चौकारांचा समावेश आहे. लियाम लिंिव्हगस्टोन 23 धावांवर बाद झाला. तर सॅम करन याने 21 धावांचे योगदान दिले. जितेश शर्मा याने 10 चेंडूत 24 धावा चोपल्या. या खेळीत जितेश शर्मा याने तीन षटकार मारले. राहुल चहर आमि कगिसो रबाडा यांना खातेही उघडता आले नाही. अर्शदीप दोन धावांवर नाबाद राहिला.
पंजाबच्या कगिसो रबाडाने दोन, सॅम करन, लिविंगस्टोन आणि अर्शदीप सिंगने प्रत्येकी एक विकेट घेतली.