हवामान विभागाने आगोदरच इशारा दिला होता की, राज्यात अनेक ठिकाणी गारपीठ, आणि अवकाळी पाऊस होण्याची शक्यता आहे. आता तर पाऊस पडतो आहे. राज्य सरकारने यावर काय केले? राज्य सरकारवर टीका केली की, मुख्यमंत्री गळा काढतात. मी गरीब शेतकऱ्याचा मुलगा आहे. त्यावर माझे काहीच म्हणणे नाही. पण, अशी पंचतारांकीत शेती राज्यातील सर्व शेतकऱ्यांना मिळावी, असा टोला उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला आहे. ते मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. या वेळी बोलताना ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांचा उल्लेख ‘गद्दार’ असा केला.
मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांना इतर राज्यांमध्ये प्रचार करण्यास, अश्वासनांची रेवडी उडवायला जातात. त्यासाठी त्यांना वेळ असतो. पण, तुमचा हात राज्यातील शेतकऱ्यांच्या पाठीवर कधी फिरणार? दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पक्ष देशभरात अश्वासने देतो आहे, आम्ही हे गॅस स्वस्तात देऊ, आमूक स्वस्तात देऊ, रामलल्लाचे दर्शन मोफत करु. पण, ते दर्शन होईल तेव्हा होईल. राज्यातील जनतेला तुमचे दर्शन कधी होणार आहे? देशातील इतर राज्यांना सवलती मिळत असताना महाराष्ट्राबाबत केंद्र सरकार दुजाभाव का करते? असा थेट सवाल उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
राज्यातील शेतकऱ्यांना पीकविम्याचे पैसे मिळाल्याशिवाय आम्ही दिवाळी साजरी करणार नाही, असे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटले होते. पण, दिवाळी उलटून गेले तरी अद्यापही या शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाहीत. त्यामुळे दिवाळीमध्ये फटाक्यांचा आवाज आला पण कृषीमंत्र्यांचा आवाज आला नाही. त्यांनी कुठे फटाके वाजवले याबाबत माहिती नाही. पण कृषीमंत्र्यांनी त्यावर काहीच भाष्यकेले नाही, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला.
महाराष्ट्र उघड्यावर टाकून मुख्यमंत्री आज तेलंगणा, उद्या दुसरे राज्य असे निवडणूक प्रचारात व्यग्र झाले आहेत. राज्य उघड्यावर टाकून देशभर फिरताना लाज वाटायला हवी, अशा तीव्र शब्दात उद्धव यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली. आम्ही टीका केल्यावर आम्ही गरीब शेतकऱ्याचा मुलगा म्हणून गळा काढतात, राज्याच्या दृष्टीने हे दुर्दैवी असल्याचेही ते म्हणाले.