(संगमेश्वर / प्रतिनिधी) नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार देशाच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये मोठा बदल होत आहे. या शैक्षणिक धोरणानुसार अनेक नवीन गोष्टी शिक्षण क्षेत्रात येत आहेत त्यातलाच एक महत्त्वाचा भाग म्हणजे पंचकोश आधारित विद्यार्थी विकसन. चिपळूण मधील प्रथितयश,जुनीजाणती शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेली संस्था म्हणजे परशुराम एज्युकेशन सोसायटी चिपळूण. या संस्थेने पाच वर्षांपूर्वीच या दृष्टिकोनातून दूरगामी विचार करून टाकलेले पुढचं पाऊल म्हणजे चिपळूण तालुक्यातील ए1कमेव पंचकोश आधारित असणारा गुरुकुल विभाग.
युनायटेड इंग्लिश स्कूलचाच एक स्वतंत्र भाग असणारे पंचकोशाधारीत गुरुकुल गेली पाच वर्ष सातत्याने अन्नमय, प्राणमय, मनोमय,विज्ञानमय आणि आनंदमय अशा पाच कोशांच्या आधारे विद्यार्थ्यांसाठी जडणघडणीसाठी अनेक वेगवेगळ्या संधी निर्माण करायचा प्रयत्न करते आहे. इयत्ता पाचवी ते दहावी या वयोगटातल्या विद्यार्थ्यांसाठी चालू असणारा हा गुरुकुल विभाग. दररोज सकाळी साडेसात ते संध्याकाळी साडेसहा या वेळेत घड्याळी अकरा तासांची शाळा हे या विभागाचे एक प्रमुख वेगळेपण आहे.
विद्यार्थ्यांच्या दैनंदिन पाठ्यपुस्तक आधारित अध्ययन अध्यापन प्रक्रियेला पूरक उपक्रम व्यवस्थेची सुनियोजित जोड देऊन विद्यार्थ्यांना स्वतः मधल्या कौशल्यांचा, गुणांचा शोध घेत घेत व्यक्तिमत्व विकासाची संधी गुरुकुल विभागातून देण्यात येते .
पाठ्यपुस्तकातील अभ्यासक्रमाशी जोडून घेऊन केलेली पूरक उपक्रमांची रचना हे गुरुकुल विभागाचे वैशिष्ट्य! क्षेत्रभेटी, व्यक्तीभेटी , शिबिरे , मुलाखती, सहाध्याय दिवस, दिनविशेष अनुषंगाने होणारे संस्कृती जपणारे कार्यक्रम, पेटंट इंग्रजी, संगणक प्रशिक्षण यासोबतच संगीत प्रशिक्षण, विक्री उपक्रम, कौशल्य प्रशिक्षण, अशा अनेक गोष्टींना मध्यवर्ती ठेवून विद्यार्थ्यांच्या वर्षभराच्या अभ्यासाचे नियोजन अर्थपूर्ण करण्याकडे गुरुकुल विभागाचा विशेष भर असतो.
निवासी शिबिरे, मातृभूमी परिचय शिबिरे, काही नैमित्तिक कार्यक्रम इत्यादी करिता जास्तीचे दिवस गुरुकुल विभागामध्ये उपयोगात आणले जातात परिणामी दररोजच्या जास्तीच्या वेळेसोबतच बाकी सगळ्या शाळांपेक्षा जास्त दिवस चालणारी,सुट्ट्या कमी असणारी शाळा हेही गुरुकुलचे वेगळेपण. मर्यादित नेमकी विद्यार्थी संख्या हे एक आणखीन वैशिष्ट्य !! विद्यार्थी संख्या मर्यादित असल्यामुळे येथे विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष देऊन मार्गदर्शन होत असते.पंचकोशाधारीत गुरुकुल अशी मूळ संकल्पना असलेल्या निगडी पुणे येथील ज्ञानप्रबोधिनीचा नैमित्तिक सहवास आणि मार्गदर्शन या गुरुकुल विभागाला मिळते.
दैनंदिन वेळापत्रकामध्ये नियमित व्यायाम,योग, सूर्यनमस्कार,कौशल्य प्रशिक्षण, पाठ्यपुस्तक आधारित अध्ययन अध्यापन, छंद वर्ग प्रशिक्षण, स्वयंअध्ययन, आणि मैदानी खेळ अशा रचनेनुसार गुरुकुल चे कामकाज चालते.रोज होणारे एक तास मैदानी खेळ, एक तास शारीरिक कसरतीचे व्यायाम यामुळे मुलांचे शरीर सुदृढ व मन प्रसन्न राहते आणि त्याचा सकारात्मक परिणाम मुलांच्या अध्ययन अध्यापन प्रक्रिये वर झालेला दिसून येतो. गुरुकुल बाबत दृश्य परिणाम दर्शवणारा हा सकारात्मक अनुभव बोलका आहे.
गुरुकुल मधील खेळामध्ये रुची असणारे विद्यार्थी खेळ,योग अशा विविध क्रीडा स्पर्धांमध्ये तालुका जिल्हा विभाग राज्यस्तरापर्यंत नैपुण्य मिळवत असतात. कला छंद संगीत यामध्ये रुची असणाऱ्या विद्यार्थ्यांना तशा प्रकारची संधी दिली जाते तर वक्तृत्व भाषण यामध्ये रुची असणाऱ्या विद्यार्थ्यांना अशा प्रकारच्या संधी येथे आवर्जून उपलब्ध करून दिल्या जातात व या सगळ्यासाठी गरजेनुसार पुरेसे मार्गदर्शनही गुरुकुल मध्ये केले जाते.
स्वतंत्र,सुसज्ज प्रशस्तवर्ग खोल्या, आधुनिक ई लर्निंग व्यवस्थेसह उपलब्ध असणाऱ्या गुरुकुल विभागात संस्कारी-पारंपारिक वातावरण रुजवण्यासाठी विद्यारंभ उपासना, वर्षारंभ उपासना, विद्याव्रत संस्कार,वर्षांत उपासना असे शैक्षणिक संस्कार विद्यार्थ्यांवर आग्रहपूर्वक करण्याचा प्रयत्न गुरुकुल मध्ये केला जातो. स्वयंअध्ययन, प्रकल्प, कार्यक्रमातील नियोजन सूत्रसंचालन यातील प्रत्यक्ष सहभाग, मुलाखती घेण्याचे अनुभव, यातून निर्माण होणारे संवाद- संभाषण कौशल्य विकसन, अहवाल- आढावा लेखन अशा अनेक गोष्टींमधून निर्माण होणाऱ्या आत्मविश्वासाने विद्यार्थ्यांचे चहूदिश व्यक्ती घडण होते. विद्यार्थ्यांना परीक्षार्थी बनवण्यापेक्षा विद्यार्थी घडवण्याकडे गुरुकुल आग्रही असते.
निव्वळ एखादा तास जास्तीची शाळा, जास्तीचे सराव, एखादा तास कौशल्याधारित उपक्रम म्हणजे गुरुकुल नाही तर वेद पुराणादि वाङ्मयात प्राचीन अभ्यास पद्धतीमध्ये सांगितल्याप्रमाणे अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय आणि आनंदमय या पाचही कोशांच्या विकसनातून विद्यार्थ्यांमध्ये व्यक्तिमत्व घडणीसाठी केलेला अर्थपूर्ण प्रयत्न म्हणजे गुरुकुल पंचकोशाधारीत गुरुकुल. चिपळूण तालुक्यात असे विद्यार्थी व्यक्तिमत्व घडणीचे कार्य हाती घेतलेले दररोज घड्याळी अकरा तास आणि वर्षभर जवळपास पावणेतीनशे दिवस कार्यरत राहून विद्यार्थी व्यक्तिमत्व घडण करणारे परशुराम एज्युकेशन सोसायटीचे एकमेव पंचकोशाधारित गुरुकुल आहे.
यावर्षी गुरुकुल ची पहिली तुकडी माध्यमिक शालांत परीक्षेला परिपूर्ण अभ्यास,सराव करून आत्मविश्वासाने सामोरी गेली आहे.आजच्या स्पर्धेच्या युगात आपणही सर्वांनी परंपरा आणि संस्कृती जपत अभ्यासाला दर्जेदार उपक्रमांची जोड देत विज्ञान तंत्रज्ञानाची जोड देत आपल्या विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी आपल्या प्राचीन परंपरांमध्ये सांगितलेल्या गुरुकुल पद्धतीचा अनुभव आपल्या पाल्यांना द्यायला हवा.