(रत्नागिरी)
एस. आय. ग्रुप इंडिया प्रा.लि..सेवा सहयोग फाऊंडेशन मुंबई व लोकजागर संस्था, रत्नागिरी यांच्या सहयोगाने न्यू इग्लिश स्कूल, सैतवडे येथे बांधण्यात आलेल्या मुलींसाठीच्या अद्ययावत स्वच्छतागृहाचे हस्तांतरण कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. यावेळी एस. आय. ग्रुपचे अधिकारी सचिन आणेराव, सेवासहयोग फाऊंडेशनचे प्रतिनिधी विशाल देसाई, लोकजागर संस्थेचे सामाजिक कार्यकर्ते सतिश थुळ, शैक्षणिक व सामाजिक संस्था सैतवडेचे सचिव समिर सय्यद व पदाधिकारी, ॲक्टीव्ह फ्रेन्डस सर्कल सत्कोडीचे संघटक संजय बैकर, अजय काताळे, प्रशालेचे मुख्याध्यापक अंगद मुठाळ, शिक्षकवृंद, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
सैतवडे सारख्या ग्रामीण भागात सुमारे 5 कि.मी.च्या परिसरातील सत्कोंडी, पन्हळी, वाटद, कोंडवाडी, मराठवाडा, जांभारी येथून मुले शिक्षणासाठी येतात. त्यांना स्वच्छतेसाठी स्वतंत्र मुला- मुलींची व्यवस्था व्हावी, खेळून आलेल्या मुलींना मुक्तव्दार असावे यासाठी सर्व सोयीनीयुक्त व सुसज्ज अशाप्रकारचे स्वच्छतागृह एस. आय. ग्रुप इंडिया प्रा.लि. च्या अर्थसहाय्यातून बांधण्यात आले. एकाच छताखाली स्वतंत्र बाधण्यात आलेल्या या स्वच्छतागृहात २ शौचालये. ४ मुतारी. सॅनिटरी नॅपकीन, वेंडीग मशिनसह चेंजिग रुम ४ wash बेसीन, आरसे, स्वच्छता प्रसाधने, हातपाय धुण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था, पाणी व लाईटव्यवस्था या गोष्टींचा समावेश आहे.
स्वच्छतागृहाचे हस्तांतरण करताना एस.आय. ग्रुपचे सचिन आणेराव यांच्या हस्ते फित कापून व सेवासहयोगचे विशाल देसाई यांच्याहस्ते फलक अनावरण करुन झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शैक्षणिक संस्थेचे सचिव समिर सय्यद होते. प्रथम मान्यवरांचा सन्मान शाल श्रीफळ व मुलांच्या हस्तकौशल्यातून साकारलेले पुष्पगुच्छ देवून करण्यात आला. याच कार्यक्रम प्रसंगी स्वच्छता विषयावर विद्यार्थ्यांनी काढलेल्या रांगोळीचे प्रदर्शन मांडण्यात आले होते. प्रशालेतील १००% मुलांना आवश्यक असणारे शैक्षणिक साहित्य दप्तरासह वाटप करण्यात आले होते.
ग्रामीण भागात संगणक साक्षरता यावी, विद्यार्थ्यांना सराव व्हावा यासाठी संगणक प्रशिक्षण कार्यक्रम एक वर्षासाठी सुरू आहे. याच्या यशस्वीतेबाबत विद्यार्थी व प्रशिक्षक यांनी आपली मनोगते व्यक्त केली. स्वच्छतागृहाचे बांधकाम मुदतीत व सुयोग्य केल्याबद्दल अजय काताळे यांचा सत्कार करण्यात आला. पाणी पुरवठा करणाऱ्या मुस्लिमीन जमातूल सैतवडेचे आभार मानण्यात आले. भारताच्या अमृतमहोत्सवानिमित्त विद्यार्थ्यांनी वेशभूषा केली होती. त्यामध्ये महात्मा गांधी साकारलेल्या विद्यार्थ्याने स्वच्छता विषयक संदेशपर भाषण करुन दिला.
स्वच्छतागृहाच्या सुसज्ज उभारणीसाठी एस.आय.ग्रुप मुंबई, सेवासहयोग फाऊंडेशन मुंबई, लोकजागर संस्था, रत्नागिरी बरोबरच शैक्षणिक व सामाजिक संस्था, सैतवडेचे सर्व पदाधिकारी,शिक्षक व सर्व सहकारी जाधव , महिला संघटक स्नेहलता शिंदे, अनिल बंडबे, स्नेहा जाधव, श्रुतिका पाताडे यांनी विशेष मेहनत घेतली.
उद्घाटन प्रसंगी सेवासहयोग फाऊंडेशनचे विशाल देसाई यांनी सेवासहयोगच्या कार्याविषयी माहिती देताना मुलांनी अशाप्रकारच्या सामाजिक कार्यक्रमाचे भविष्यातील मान्यवर बनावे. त्यासाठी उच्चशिक्षण घेऊन देशाचे समर्थ नागरीक बना अशा शुभेच्छा व्यक्त केल्या. लोकजागर संस्थेचे सामाजिक कार्यकर्ते सतीश थुळ यानी स्वच्छतागृहाच्या उभारणीमागील संस्थेची संकल्पना व उद्देश मनोगतातून व्यक्त केला.
ॲक्टीव्ह फ्रेंडस सर्कल सत्कोंडीचे संजय बैकर को.म.सा.प.रत्नागिरी शाखेचे युवाध्यक्ष अरुण मोरे यांनी उपक्रमाचे कौतुक केले. अशाप्रकारची अद्ययावत व्यवस्था ग्रामीण भागात प्रथमच पहायला मिळाली. मुंबईसारख्या शहरातील सुविधा येथे निर्माण केल्याबद्दल आभार मानले. न्यू इंग्लिश स्कूल सैतवडेचे मुख्याध्यापक अंगद मुठाळ यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख सिद्धी लांजेकर व आभार प्रदर्शन व समारोप संतोष चव्हाण यांनी केले. शालेय मुलांनी गीतगायन व पारंपारिक वेशभूषा करुन कार्यक्रमाची शोभा वाढवली. प्रशालेतील शिक्षक व सहकारी यांनी कार्यक्रम यशस्वी केला.