(नवी दिल्ली)
न्यूजक्लीक या न्यूज पोर्टलशी संबंधित ९ पत्रकारांवर दिल्ली पोलिसांनी मंगळवारी छापेमारी केली. बेकायदा कारवाया प्रतिबंध कायदा अर्थात यूएपीए कायद्यांतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करुन कारवाई करण्यात आली आहे. त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्त्या तीस्ता सेटलवाड यांच्या घरीही पोलिसांनी छापेमारी केली असून यामध्ये मुंबई पोलिसांचाही समावेश आहे.
उपलब्ध माहितीनुसार, न्यूजक्लीकसंदर्भातील ठिकाणांवर दिल्ली पोलिसांनी जी छापेमारी केली आहे. यासंदर्बात १७ ऑगस्ट रोजी भादंवि यूएपीए (बेकायदा कारवाया प्रतिबंध कायदा) आणि १५३ अ (दोन गटातील द्वेषाला प्रोत्साहन देणे) तसेच १२० ब (गुन्हेगारी कट) या कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सायंकाळी न्यूजक्लीकचे कार्यालयदेखील सील करण्यात आले आहे. या संकेतस्थळावर चीनी अजेंडा चालविण्याचाही आरोप करण्यात आला आहे.
कोणावर झाली कारवाई
वरिष्ठ पत्रकार अभिसार शर्मा, उर्मिलेश, एनडीटीव्हीचे माजी एमडी अवनिंदो चक्रवर्ती आणि इतर सहा पत्रकारांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. विविध ३० ठिकाणी छापेमारी टाकून दिल्ली पोलिसांनी ही कारवाई केली आहे. तसेच तीस्ता सेटलवाड यांच्या मालमत्तेवरही छापे टाकण्यात आले आहेत. हे सर्वजण न्यूज क्लीक या न्यूज पोर्टलशी संबंध असलेले पत्रकार आहेत. इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, कॉमेडियन संजय राजौरा यांना देखील दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेण्याची शक्यता वर्तवली आहे.
नव्याने यूएपीए दाखल
या प्रकरणात यापूर्वी ईडीने पीएमएलए अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर आता दिल्ली पोलिसांनी यूएपीए अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. रिपब्लिक टिव्हीने याबाबत माहिती दिली आहे. न्यूजक्लीक २०२१ पासून कथीत बेकायदेशीर परदेशी फंडिंग मिळवल्याबद्दल पोलिसांच्या रडावर होते. यावेळी पत्रकार अभिसार शर्मा या पोर्टलसाठी काम करत होते. सामाजिक कार्यकर्ते तीस्ता सेटलवाड आणि गौतम नवलखा यांच्यावरही चीनकडून न्यूजक्लीकद्वारे मिळालेला फंड घेतल्याचा आरोप आहे.