अवघ्या चार वर्षांच्या पोटच्या मुलाची हत्या करणाऱ्या सूचना सेठ या महिलेने गोव्यातील जे अपार्टमेंट भाडेतत्त्वावर घेतले होते, त्यात हस्ताक्षराने लिहिलेली चिठ्ठी गोवा पोलिसांना सापडली आहे. त्यात ‘माझ्या पतीला मुलाची भेट घेण्याचा न्यायालयाचा आदेश मी सहन करू शकत नाही,’ असे लिहिले आहे.
न्यायालयाच्या निर्देशांनंतर आरोपी महिला दबावाखाली आली. आपल्या मुलानं पतीला भेटू नये, अशी महिलेची इच्छा होती. त्यामुळे तिनं आपल्या मुलालाच संपवण्याचा निर्णय घेतला. महिलेनं कट रचला, शनिवारी मुलासह गोवा गाठलं आणि तिथे जाऊन आपल्या 4 वर्षांच्या मुलाची हत्या केली. आपल्या मुलालाच संपवलं चर पती आपल्या मुलाला भेटूच शकणार नाही, असं त्या महिलेला वाटत होतं. त्यामुळेच महिलेनं मुलाची हत्या केली.
मुलाच्या हत्येप्रकरणी त्याची आई, बंगळुरूतील एका कंपनीची सीईओ असणारी सूचना सेठ हिच्याविरोधातील हा सबळ पुरावा गोवा पोलिसांना सापडला आहे. पोलिसांनी हे पत्र सील केले असून हस्ताक्षरतज्ज्ञांच्या तपासणीसाठी ते फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीकडे पाठवले आहे. सूचना आणि तिचा पती या दोघांची बेंगळुरूमध्ये भेट झाल्यानंतर त्यांचा विवाह सन २०१०मध्ये झाला होता. मात्र त्यांनी घटस्फोट घेण्यासाठी अर्ज केला होता. त्याची सुनावणी सुरू होती.
या दरम्यानच न्यायालयाने तिच्या पतीला दर रविवारी त्यांच्या मुलाची भेट घेण्याची परवानगी दिली होती. तिने सन २०२२मध्ये तिचा पती वेंकट रमण याच्याविरोधात घरगुती हिंसाचाराची तक्रार दाखलही केली होती. सूचना हिने रमण याला दरमहा नऊ लाख रुपये पगार असल्याचे सांगत त्याच्याकडे खर्च म्हणून दर महिना अडीच लाख रुपयांची मागणी केली होती. मात्र त्यांचा मुलगा हा तिच्या पतीसारखा दिसत असल्याने आणि त्याच्याकडे पाहिल्यावर नेहमीच त्याच्या दुरावलेल्या नात्याची आठवण येत असल्याचे सूचना हिने तिच्या मैत्रिणी आणि नातेवाइकांना सांगितल्याचे गुरुवारी उघड झाले होते.
६ जानेवारी रोजी ती तिच्या मुलासोबत गोव्यातील एका सर्व्हिस अपार्टमेंट भाडेतत्त्वावर घेऊन राहण्यासाठी आली होती. मात्र दोन दिवसांनी ती एकटीच बाहेर पडली. तिथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला अपार्टमेंटमध्ये रक्ताचे डागही आढळले. तसेच, तिच्यासोबत मुलगा नसल्याचे लक्षात आल्यावर कर्मचाऱ्याला संशय आला. त्यानंतर ताबडतोब पोलिसांना कळवल्यानंतर तिला अटक करण्यात आली.
असा आहे हत्येचा घटनाक्रम
– शनिवारी (दिनांक 6) सूचना सेठ यांनी त्यांच्या मुलासह गोव्यातील कँडोलिममधील हॉटेलमध्ये चेक इन केलं.
– सोमवारी सूचना सेठ यांनी चेक आऊट केलं. पण चेक आऊट करताना त्या एकट्याच होत्या.
– बंगळुरूला जाण्यासाठी टॅक्सी बुक करण्याची सेठ यांनी हॉटेलला विनंती केली.
– हॉटेल व्यवस्थापनाने त्यांना विमानाने प्रवास करण्याचा सल्ला दिला, पण टॅक्सीनेच जाण्यासाठी सेठ ठाम होत्या.
– सेठ या चेकआऊट करताना त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा नसल्याचं हॉटेल व्यवस्थापनाच्या निदर्शनास आलं.
– हाऊस कीपिंगला सेठ यांच्या खोलीत रक्ताचे डागही आढळले.
– गोवा पोलिसांनी तातडीने टॅक्सीचालकाद्वारे सेठ यांच्याशी संपर्क केला.
– त्यावेळी मुलगा आपल्या मित्राकडे असल्याचा दावा सेठ यांनी केला. पण सेठ यांनी दिलेला पत्ता हा खोटा असल्याचं उघड झालं.
– गोवा पोलिसांनी पुन्हा एकदा टॅक्सीचालकाशी संपर्क साधला आणि त्याला कोकणी भाषेत काही सूचना दिल्या.
– बंगळुरूपासून 200 किमी दूर असलेल्या चित्रदुर्ग पोलीस स्टेशनमध्ये टॅक्सी नेण्याच्या सूचना पोलिसांनी त्याला दिल्या.
– चित्रदुर्ग पोलिसांनी सेठ यांची बॅग तपासली असता त्यांना त्या बॅगेत त्यांच्या मुलाचा मृतदेह आढळला. त्यानतंर पोलिसांनी सेठ यांना अटक केली.