(वैभव पवार/गणपतीपुळे)
रत्नागिरी तालुक्यातील श्री क्षेत्र गणपतीपुळे नजिकच्या भगवतीनगर परिसरात परजिल्ह्यातील एका व्यक्तीने आपण उच्च पदावर मोठा अधिकारी असल्याचे भासवत अनेक लोकांची फसवणूक केल्याची माहिती पुढे आली आहे. यामध्ये भगवतीनगर परिसरातील अनेक उच्चशिक्षित विद्यार्थ्यांना नोकरीची आमिषे दाखवून त्याने पैशांची लुबाडणी केल्याची माहिती आता ग्रामस्थांकडून दिली जात आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,रत्नागिरी तालुक्यातील भगवतीनगर येथे एका प्रतिष्ठित व्यक्तीच्या भाड्याने दिल्या जाणाऱ्या रुममध्ये गेल्या चार महिन्यांपासून एक बोगस अधिकाऱ्याने अकरा महिन्यांच्या कराराने भाडेतत्त्वावर रुम घेऊन आपला बोगस नोकरीचा मोठा व्यवसाय आर्थिक लुबाडणीच्या नावाखाली सुरू केला होता. सुरुवातीला अपंग असल्याची स्थिती निर्माण करीत त्याने येथील स्थानिक एका खाजगी रिक्षा आणि चारचाकी वाहनातून संपूर्ण भगवतीनगर, गणपतीपुळे, मालगुंड परिसरात फिरून अनेकांना नोकरी लावण्याचे अमिष दाखविले. यावेळी भगवतीनगर परिसरात एका प्रतिष्ठित व्यक्तीच्या ठिकाणी ही व्यक्ती राहत असताना कुणालाही ही त्या बोगस अधिकाऱ्याने आपला संशय लागू दिला नाही.
याउलट सुरुवातीला आपण पुरवठा अधिकारी व नंतर बालकल्याण विकास अधिकारी आणि राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व अन्य महत्वाच्या खात्यांमध्ये आपण कार्यरत असल्याची माहिती स्थानिक ग्रामस्थांना सांगितली. त्यामुळे ग्रामस्थांनी ही अतिविश्वास ठेवून आपल्या मुलाबाळांना मोठ्या नोकरीमध्ये स्थान मिळेल या आशेने त्याच्याकडे संपर्क साधला. मात्र या बोगस अधिकाऱ्याने स्थानिक ग्रामस्थांच्या याच अविश्वासाचा गैरफायदा घेत त्याने अनेकांना लाखो रुपयांमध्ये फसविले आहे. त्यातच विशेष म्हणजे राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणमध्ये शिपाई व लिपिक पदावर नोकरी लावण्याचे आमिष दाखवून त्याने तब्बल 13 जणांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना उघड होत आहे. त्यातच विशेष म्हणजे या बोगस भरतीसाठी रत्नागिरी शहरातील एका मोठ्या शाळेत परीक्षाही घेण्यात आल्याचे आणि त्यासाठी याच शाळेचा शिक्षक वर्ग आणि शिपाई वर्ग हजर असल्याची माहिती पुढे आली आहे.
अनेकांना नोकरीचे आमिष दाखवणारा संशयित आता फरार झाल्याने काहींनी पोलिसांकडे धाव घेतल्याचे बोलले जात आहे विजयसिंह राजवर्धन पाटील, रा. भगवतीनगर,रत्नागिरी असे या संशयित बोगस अधिकाऱ्याचे नाव आहे. रत्नागिरीमध्ये त्याने परीक्षा घेताना काही विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी बसविले मात्र त्यानंतर पुढील टप्प्यात ही परीक्षा आपण घेणार असल्याचेही त्याने सांगितले होते. परंतु परीक्षेचा कालावधी झाल्यानंतर आठ दिवसांनी परीक्षेचा निकाल लागेल असे सांगण्यात आले. मात्र कुठलाही निकाल लागलेला नाही, म्हणून विद्यार्थ्यांनी वारंवार पाटील याला फोन करण्याचा प्रयत्न केला असता त्याचा फोन आता बंद स्थितीत लागत आहे. ही आपली मोठी फसवणूक झाल्याचे विद्यार्थ्यांच्या लक्षात येताच त्यांनी आता जयगड पोलिसांत तक्रार केल्याची माहिती पुढे येत असून पोलिसांनी या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष घालून तपासाची चक्रे फिरवावी अशी मागणी केली जात आहे.
ही बोगस भरती आणि लाखो रुपयांना गंडा घातल्याचे प्रकार घडत असताना यामागे मोठे रॅकेट तर नाही ना? असा प्रश्न आता ग्रामस्थांकडून केला जात असून संबंधित जयगड पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल चौकशीअंती छडा लावावा अशी मागणी केली जात आहे. त्यातच विशेष म्हणजे या बोगस अधिकाऱ्याने आपली बनावट कागदपत्रेही तयार केल्याची माहिती ग्रामस्थांकडून दिली जात आहे. तसेच मागील कोरोना लसीकरण मोहीम वेळीही या बोगस अधिकाऱ्याने भगवतीनगर परिसरात एका लसीकरण केंद्रावर जाऊन बनावट कागदपत्रांद्वारे कोवीड लस घेतल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले आहे. एकूणच त्याचे आधारकार्डच बोगस असल्याचे माहिती प्राप्त झाली आहे.
अशा या विविधारंगी बोगस अधिकाऱ्याचा पर्दाफाश करण्यासाठी ग्रामस्थांनी न घाबरता आता पुढे यावे, असे मत व्यक्त होत आहे