(मुंबई)
भारतात मानसिक आरोग्य सेवा कायदा 2017 मध्ये मंजूर झाला आहे. परंतु गेल्या 6 वर्षांत या कायद्यांतर्गत देशात एकही मनोरुग्ण ऑपरेशन (सायकोसर्जरी) करण्यात आले नव्हते. आता मुंबईत, डॉक्टरांनी या कायद्यांतर्गत पहिले यशस्वी मानसोपचार ऑपरेशन केले आहे, जे भारतातील पहिले ऑपरेशन आहे. गेल्या 26 वर्षांपासून डिप्रेशनने त्रस्त असलेल्या 38 वर्षीय ऑस्ट्रेलियन महिलेवर ही सायकोसर्जरी करण्यात आली आहे.
ही ऑस्ट्रेलियन महिला रुग्ण तब्बल 26 वर्षांपासून नैराश्याने त्रस्त होती आणि उपचारासाठी विविध औषधेही घेत होती. ती प्रशिक्षित व्यावसायिक थेरपिस्ट असूनही, तिने 7 वर्षांपूर्वी कामावर जाणे बंद केले होते. तिच्या भावाने सांगितले की, तिने 20 वेगवेगळ्या अँटीडिप्रेसन्ट्सचा प्रयत्न केला होता परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही. काही वर्षांपूर्वी जसलोक हॉस्पिटलमध्ये नैराश्यासाठी डीबीएस झालेल्या दोन ऑस्ट्रेलियन रूग्णांकडून तिच्या कुटुंबाला डॉ. दोशीचा संदर्भ मिळाला. त्यानंतर त्यांनी डॉक्टरांशी संपर्क साधला व पुढील प्रक्रिया सुरु झाली. ऑस्ट्रेलियामध्ये डीबीएसची ऑफर दिली जात नाही, कारण ती अजूनही नैराश्यासाठी प्रायोगिक थेरपी मानली जाते. सुमारे 3 आठवड्यांपूर्वी रुग्णावर डीबीएस शस्त्रक्रिया झाली होती. डॉ. दोशी म्हणाले की, शस्त्रक्रियेचा परिणाम स्पष्टपणे दिसण्यासाठी आणखी काही महिने लागतील.
अहवालानुसार, मेंटल हेल्थ केअर अॅक्ट, 2017 नुसार, सायकोसर्जरी केवळ रुग्णाच्या संमतीने आणि विशेष गठित राज्य मानसिक आरोग्य मंडळाच्या मान्यतेने केली जाऊ शकते. यापूर्वी हॉस्पिटल बोर्ड अशा अर्जांचे मूल्यमापन करत असे. सायकोसर्जरी करण्याची प्रक्रिया सुरू झाल्यापासून त्याची मंजुरी आणि ऑपरेशनसाठी सुमारे 10 महिन्यांचा कालावधी लागल्याचे सांगण्यात येते.
ऑस्ट्रेलियन महिलेने जसलोक रुग्णालयातील न्यूरोसर्जन डॉ. परेश दोशी यांच्याशी संपर्क साधला आणि 28 मे रोजी ऑपरेशन करण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून परवानगी घेण्याची प्रक्रिया सुरू झाली. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 10 महिन्यांचा कालावधी लागला. जसलोक हॉस्पिटलमध्ये ऑस्ट्रेलियन महिलेवर सायकोसर्जरी शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉ. दोशी यांनी सांगितले की, मानसिक आरोग्य मंडळ स्थापन करण्यात महाराष्ट्र हे इतर राज्यांच्या तुलनेत केवळ पुढे नाही, तर शस्त्रक्रियेला परवानगी देणारे पहिले राज्य बनले आहे. मानसोपचार तज्ज्ञ डॉ. परेश दोशी यांनी सांगितले की, नैराश्याने त्रस्त रुग्णांवर उपचार करण्याचा शेवटचा उपाय म्हणून काही रुग्णांवर डीप ब्रेन स्टिम्युलेशन (डीबीएस) शस्त्रक्रिया केली जाते. यामध्ये न्यूरोपॅथवे बदलण्यासाठी मेंदूमध्ये इलेक्ट्रोड्स बसवले जातात.