(देवरूख/प्रतिनिधी)
कोकण रेल्वे मार्गावरून धावणार्या नेत्रावती एक्सप्रेसला कर्नाटकमध्येच भटकळ स्थानकावर आजपासून (9 मार्चपासून) प्रायोगिक तत्त्वावर थांबे देण्यात आले आहेत. दरम्यान, कोकण रेल्वेच्या मार्गावर मागील काही वर्षांपासून नेत्रावती तसेच मत्स्यगंधा एक्सप्रेसच्या संगमेश्वर रोड थांब्यासाठी आंदोलने करूनही रेल्वेने थांबा मंजूर केलेला नाही. यामुळे एकाच मार्गावरील दोन राज्यांमध्ये कोकण रेल्वेचा दुजाभाव स्पष्ट झाला आहे.
याचबरोबर लोकमान्य टिळक टर्मिनस ते तिरुअनंतपुरमदरम्यान धावणारी नेत्रावती एक्सप्रेस (16345) 9 मार्चपासून भटकळ स्थानकावर थांबा घेणार आहे. परतीच्या प्रवासात म्हणजे तिरुअनंतपुरम ते लोकमान्य टिळक टर्मिनसदरम्यान धावताना नेत्रावती एक्सप्रेस (16346) 9 मार्च 2023 पासून भटकळ स्थानकावर थांबा घेणार आहे. पुढील सहा महिन्यांसाठी प्रायोगिक तत्त्वावर हे थांबे देण्यात आले आहेत.
दरम्यान, कोकण रेल्वे मार्गावरील संगमेश्वर रोड, राजापूर रोड, वैभववाडी तसेच खेड स्थानकावर आणखी काही एक्सप्रेस गाड्यांना थांबे द्यावेत, अशी विविध संघटनांकडून वारंवार मागणी केली जात आहे. चिपळूण-संगमेश्वरचे स्थानिक आमदार शेखर निकम यांच्यासह निसर्गरम्य चिपळूण-निसर्गरम्य संगमेश्वर फेस ग्रुपच्या शिष्टमंडळाने बेलापूर येथील कोकण रेल्वेच्या मुख्यालयात कोकण रेल्वेचे सीएमडी संजय गुप्ता यांच्याशी संगमेश्वर थांब्यासंदर्भात चर्चा देखील केली. मात्र, प्रत्येक वेळी कोकण रेल्वे प्रशासनाकडून अपेक्षित भारमान तसेच या संदर्भात रेल्वे बोर्डाकडे प्रस्ताव विचारार्थ पाठवला आहे, असं सांगून यासाठी मागणी करणार्यांच्या हाती धुपाटणे दिले जात आहे. या संदर्भात रेल्वेकडून होत असलेल्या दुज्याभावामुळेच संगमेश्वरवासियांना सोबत घेऊन निसर्गरम्य चिपळूण-निसर्गरम्य संगमेश्वर फेसबुक ग्रुपचे प्रमुख संदेश जिमन व सहकार्यांना आंदोलन करावे लागले होते. मात्र, तरीही संगमेश्वर स्थानकावर नेत्रावती तसेच मत्स्यगंधा एक्सप्रेसला प्रायोगिक तत्त्वावर का होईना थांबा देण्याबाबत कोणताच निर्णय घेण्यात न आल्यामुळे संगमेश्वरवासियांना वरचेवर आंदोलनाचे हत्यार उपसावे लागत आहे.