( संगमेश्वर / प्रतिनिधी )
कोकण रेल्वेच्या संगमेश्वर रेल्वे स्थानकावर नेत्रावती व मत्स्यगंधा एक्सप्रेस गाड्यांना थांबा मिळावा, म्हणून निसर्गरम्य चिपळूण आणि निसर्गरम्य संगमेश्वर फेसबुक ग्रुपच्या माध्यमातून प्रजासत्ताक दिनी केलेल्या आंदोलनानंतर लक्ष घालण्याचे आश्वासन देणाऱ्या कोकण रेल्वे प्रशासनाने सहा महिने झाले, तरी आपला शब्द पाळलेला नाही. त्यामुळे आंदोलनकर्ते पुन्हा एकदा येत्या स्वातंत्रदिनी १५ ऑगस्ट रोजी आंदोलन करणार आहेत. संगमेश्वर रोड रेल्वेस्थानकामध्ये नेत्रावती व मत्स्यगंधा या एक्स्प्रेस गाड्यांना थांबा देण्यात यावा, ही त्यांची प्रमुख मागणी आहे.
आंदोलनाचा इशारा
हे आंदोलन २६ आणि २७ जानेवारी या दोन दिवसांत झाले. अनेक मान्यवरांनी उपोषणस्थळी आंदोलकांना भेट देऊन पाठिंबा दर्शविला. कोकण रेल्वेचे रिजनल मॅनेजर रवींद्र कांबळे यांनी या प्रश्नावर आम्ही सकारात्मक विचार रेल्वे बोर्डकडे दुसऱ्यांदा प्रस्ताव पाठवू’ असे आश्वासन दिले होते. परंतु त्यानंतर ५ ते ६ महिन्यात कोकण रेल्वेने कोणतीही सकारात्मक कृती केल्याचे दिसले नाही. ‘आमचा पाठपुरावा चालू आहेच, पण कोकण रेल्वेकडून अजून उत्तर आलेले नाही. यासाठी संगमेश्वरवासियांच्या न्याय हक्कासाठी पुन्हा एकदा उपोषणाचे हे हत्यार आम्ही उपसत आहोत.