(मुंबई)
नॅक रँकिंगमुळे शैक्षणिक क्षेत्राचे नव्हे तर देशाचे नुकसान आहे, देशाच्या भावी पिढीचे नुकसान आहे. विद्यार्थ्यांच्या आणि देशाच्या हिताशी आपण खेळतो आहोत, अशी चिंताही त्यांनी व्यक्त केली. उच्च शिक्षण आणि इतर शैक्षणिक संस्थांचे मूल्यांकन राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रमाणन परिषदेकडून करण्यात येते. त्यांनी दिलेल्या मूल्यांकनाच्या आधारे महाविद्यालये, विद्यापीठांना अनुदान दिले जाते. परदेशी विद्यापीठाना बोलावून त्यांना रेड कार्पेट ट्रीटमेंट देण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी एक लॉबीच काम करत असल्याचा आरोप त्यांनी केला. या लॉबीला परदेशी विद्यापीठे या देशात आणायची आहेत, असा दावाही त्यांनी केला.
नॅक रँकिंग ही विद्यार्थ्यांची साफ फसवणूक करणारी असून खोट्या रँकिंग देण्याची एक हजार टक्के हमी देणारी यंत्रणा खालपासून वरपर्यंत असल्याचा खळबळजनक आरोप नॅकचे माजी अध्यक्ष भूषण पटवर्धन यांनी केला. नॅकच्या रँकिंग खोट्या असून त्या आधारीत अनुदाने दिली जात असल्याचे त्यांनी म्हटले. आपण राजीनामा दिला नव्हता. मात्र, इच्छा व्यक्त केलेले पत्रच राजीनामा म्हणून स्वीकारले असल्याचा दावाही त्यांनी केला. काही दिवसांपूर्वीच भूषण पटवर्धन यांनी नॅकच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. मात्र आपण परदेशी विद्यापीठाला विरोध केला म्हणून राजीनामा स्वीकारण्याची घाई केली असावी, अशी शंका त्यांनी व्यक्त केली. त्यांनी एका खाजगी वाहिनीशी बोलताना नॅकचा गैरकारभार आणि शिक्षणाच्या बाजारीकरणावर भाष्य केले.
भूषण पटवर्धन यांनी म्हटले की, नॅककडून करण्यात आलेल्या रँकिंग या खोट्या आहेत. ही बाब माझ्या लक्षात आल्यावर रँकिंगमध्ये कसा बदल हवा, यावर श्वेतपत्रिका काढली. ही श्वेतपत्रिका बहुमताने स्वीकारली. पण त्यावर काहीही अंमल करण्यात आला नाही, असे ते म्हणाले. परदेशी विद्यापीठे भारताकडे बाजारपेठ म्हणून पाहत आहेत. त्यांच्यासाठी एक लॉबी कार्यरत आहे. परदेशी शैक्षणिक वातावरण निर्मिती आपल्या विद्यापीठामध्ये करायला पाहिजे. परदेशात उत्तम नावीन्यपूर्ण संशोधन चालते. भारतीय विद्यापीठांनादेखील मोकळीक दिली पाहिजे, अशी आग्रही भूमिका पटवर्धन यांनी मुलाखतीत मांडली. शिक्षणाचे बाजारीकरण हळूहळू व्यापक केले जात आहे. त्यामुळे शिक्षण महाग होणार आहे. मुलांना ते परवडणार नाही असेही त्यांनी म्हटले.