(मुंबई)
नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे वेळेत व्हावेत, पंचनाम्याबद्दल शेतक-यांच्या तक्रारी येऊ नयेत, यासाठी येत्या जूनपासनू ई-पंचनामे करण्यात येतील. सर्वेक्षणासाठी उपग्रह आणि ड्रोनची मदत घेण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. नैसर्गिक आपत्तीमध्ये झालेल्या नुकसानीचे पंचनामे वेळेत व्हावेत, यासाठी या वर्षापासून आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेण्यात येत आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृह येथे विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांची एक दिवसीय परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी मुख्यमंत्र्यांनी आपत्तीच्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार असल्याचे सांगितले. येणा-या काळात मानवी हस्तक्षेप टाळून माहिती तंत्रज्ञानाची मदत घेऊन मोबाईलद्वारे ई -पंचनामा करण्यात येणार आहे. यामुळे शेतक-यांना पारदर्शक पध्दतीने आणि तातडीने मदत मिळावी, याकरिता सर्वेक्षणासाठी उपग्रह आणि ड्रोनची मदत घेऊन संगणकीय प्रणाली वापरण्यात येणार आहे.
शेतक-यांना नैसर्गिक आपत्तीमध्ये देण्यात येणा-या मदतीत वाढ करण्यात आली असून आता एसडीआरएफच्या दुप्पट दराने शेतक-यांना मदत करण्यात आली आहे. याशिवाय राज्य आपत्ती प्रतिसाद निधीकडून (एसडीआरएफ) द्यावयाच्या मदतीचे वाढीव दर लागू करण्याबरोबरच आता ३ हेक्टर मर्यादेपर्यंत शेतक-यांना मदत देण्यात येत आहे.
गेल्या काही दिवसांत वातावरणात वाढलेली तीव्र उष्णता, गारपीट, अवकाळी पाऊस यामुळे शेतक-यांचे होत असलेले नुकसान हे अत्यंत महत्वाचे विषय आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये शेतक-यांचे बरेच नुकसान झाले आहे. राज्यातील शेतक-यांना आधार देणे, त्यांच्या पाठीशी उभे राहणे हे आपले कर्तव्य आहे. मदत व पुनर्वसन विभागाकडून तातडीने पंचनामे करण्यात आले आहेत. येणा-या काळातही आपण सर्वांनी दक्ष राहून आवश्यक ती खबरदारी घेऊन आपले काम जबाबदारीने करावे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
केवळ १ रुपया भरून पीक विम्याचा लाभ
प्रधानमंत्री कृषि सन्मान योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आणण्यात आली आहे तर प्रधानमंत्री पीक विमा योजनेत आता शेतक-यांना केवळ १ रुपया भरून प्रधानमंत्री पीक विम्याच्या पोर्टलवर नोंदणी करता येणार आहे असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.