(राळेगणसिद्धी – अहमदनगर)
निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे काम हे पर्यावरणीय प्रबोधनाच्या चळवळीतील एक साधन आहे. समाज प्रबोधनाची ही चळवळ आपण सर्वांनी जपलेली आहे. ती संपणारी नाही. काळानुसार प्रबोधनाचे मुद्दे बदलतात पण आवश्यकता संपत नाही. त्यामुळे प्रबोधनाच्या आपल्या सारख्या साधनांची गरजही संपणार नाही. सध्याच्या काळातील प्रबोधन चळवळीचा एक प्रमुख मुद्दा पर्यावरण पूरक जनजागृतीचा आहे. आपले पर्यावरण मंडळ या पर्यावरणीय प्रबोधनाच्या चळवळीतील एक साधन म्हणून गेली दोन दशके कार्यरत असल्याचे कोकणातील पर्यावरण-पर्यटन चळवळीतील कार्यकर्ते, लेखक धीरज वाटेकर यांनी सांगितले. मंडळाच्या जागतिक पर्यावरण दिन, संस्थापक-अध्यक्ष स्व. ‘वृक्षमित्र’ आबासाहेब मोरे जयंतीदिन आणि नूतन कार्यकारिणी नियुक्तीपत्र प्रदान कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर आंतरराष्ट्रीय ख्यातीचे नेत्रचिकित्सक ‘पद्मश्री’ डॉ. विकास महात्मे, शासनाच्या ‘सारथी’चे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे, वंडर बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सने सन्मानित डॉ. सुधा कांकरिया, प्राथमिक शिक्षण संचालक (सेवानिवृत्त) दिनकर टेमकर, उपवनसंरक्षक सुवर्णाताई माने (भा.व.से.), सामाजिक वनीकरणचे विभागीय वनाधिकारी सचिन कंद, चांगुलपणाची चळवळचे संस्थापक राज देशमुख, पर्यावरण मंडळ अध्यक्षांचे प्रमोद मोरे, सचिव वनश्री मोरे-गुणवरे होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे कार्यक्रमाला अण्णा हजारे उपस्थित नव्हते. राज्य पर्यावरण कार्यशाळेला राज्याच्या अहमदनगर, पुणे, उस्मानाबाद, छत्रपती संभाजीनगर, जालना, ठाणे, धुळे, नंदुरबार, नांदेड, नाशिक, पालघर, बीड, भंडारा, मुंबई, रत्नागिरी, रायगड, लातूर, वर्धा, वाशिम, सांगली, सातारा, सोलापूर, नागपूर, कोल्हापूर या २४ जिल्ह्यातील प्रतिनिधी उपस्थित होते. पर्यावरणीय कामाची आवश्यकता संस्थापक-अध्यक्ष ‘वृक्षमित्र’ स्व. आबासाहेबांनी ओळखून १९८१-८२ साली आदरणीय अण्णांच्या मार्गदर्शनाखाली काम सुरू केले होते.
वाटेकर पुढे म्हणाले, राज्यातील प्रतिनिधींना मान्यवरांकडून मार्गदर्शन मिळवून देण्याचा आजचा दिवस आहे. मंडळाचे संस्थापक-अध्यक्ष आबासाहेब म्हणायचे, ‘वृक्षसंवर्धनाचं आपलं काम जाणीव-जागृतीचं आहे.’ रेल्वेच्या एखाद्या डब्यासारखं लांबचलांब महाराष्ट्रभर पसरलेल्या या सामाजिक कामस्वरूप रेल्वेच्या डब्यात आजवर अनेक प्रवासी येऊन बसले. काही उतरले. पण ना हा डबा थांबला ना हे काम! काही प्रवासी पुन्हा नव्याने बसले. अजूनही काही नव्याने येतील.’ आबासाहेबांना श्रद्धांजली वाहताना आदरणीय अण्णा म्हणाले होते, ‘आबासाहेब यांचे विचार पुढे घेऊन जाणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली. पर्यावरणाच्या समस्येने जग चिंताग्रस्त आहे. चांगलं काम उभं व्हायला कार्यकर्त्याला वेड लागावं लागतं. समाजाच्या भल्यासाठीच्या वेडात चांगली कामं होतात. स्वतःसाठी जगणारी माणसं कायमची मरतात. जी माणसं आपला गाव, समाज असा विचार करतात ती खऱ्या अर्थाने जगतात. म्हणून प्रपंच मोठा करा, मोठ्या प्रपंचात आनंद आहे. लहान प्रपंचात दु:ख आहे. सतत काम करत राहा. नैराश्य हा एक रोग आहे. जीवनात नैराश्य येऊ देऊ नका. आबासाहेबांनी वेड्यासारखं बेभान होऊन पर्यावरणाचं काम केलं होतं’. आपण ही प्रेरणा घेऊन एकत्र आल्याचे त्यांनी नमूद केले.
वाटेकर म्हणाले, पर्यावरणाच्या दृष्टीने काळ मोठा कठीण आला आहे. आपल्या समाजसुधारणांच्या सर्वच क्षेत्रात अनास्था आहे, असं म्हटलं जातं. अनास्था कमी करण्यासाठी आपण सातत्याने लोकांसमोर विविधांगाने विषयाची मांडणी करत राहिलं पाहिजे. बदललेल्या समाजजीवनाच्या चक्राचा आपण विचार करायला हवा आहे. पर्यावरणीय चांगल्या कामांना समाजाचा अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही, हे सत्य आहे. पण हेही दिवस बदलतील. जे चांगले आहे ते टिकेल. म्हणून आपण सर्वांनी चांगुलपणाची कास धरून अण्णा हजारे आणि स्वर्गीय आबासाहेब मोरे यांनी घालून दिलेल्या मार्गावरून चालत राहायला हवं अशी उर्जा देणारा आजचा दिवस असल्याचे सांगितले.
यावेळी रामसर ग्रुप पुणेचे अलीभाई देखाणी, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ आणि युनिटेक सोसायटीचे सचिव डॉ. सोमनाथ पाटील, मॅग्नस व्हेनचर्स, पुणेचे आलोक काळे, वृक्षप्रेमी मनकर्णा भिवसेन जाधव, छत्तीसगड राज्यात कापडी पिशवी वाटप उपक्रम राबविणाऱ्या शुभांगी आपटे यांच्यासह रत्नागिरी जिल्ह्यातील मंडळाचे राज्य कार्याध्यक्ष विलास महाडिक, शैलजा आखाडे, मोहन पाटील, मायावती शिपटे, ओंकार शिपटे, संगिता गावडे सहभागी झाले होते. आभार प्रमोद काकडे यांनी मानले.